अंतराळातही भारताचा वाढता दबदबा | पुढारी

अंतराळातही भारताचा वाढता दबदबा

काही दिवसांपूर्वी ‘इस्रो’ने एकाच वेळी नऊ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले. अंतराळ विज्ञानाच्या जगतात भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’चा दबदबा वाढत आहे. विशेषतः ‘इस्रो’च्या मोहिमांमधील यशाच्या हमीमुळे प्रगत देशांतही या संस्थेविषयीची विश्वासार्हता निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरातील छोटे देशही आपल्या मोहिमा पूर्ण करण्यासाठी भारताकडे आकर्षित होत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे नक्कीच शुभचिन्ह मानले पाहिजे.

‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी मागील काही वर्षांमध्ये अंतराळ जगतात आपली यशोपताका दिमाखाने फडकवली आहे. नुकतेच इस्रोने अंतराळ प्रक्षेपणाच्या क्षेत्रात यशाचा नवा झेंडा फडकावला आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहराकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून इस्रोने जगभरातील महासागरांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करण्यासाठी आणि चक्रीवादळांवर नजर ठेवण्यासाठी तिसर्‍या पिढीच्या ओशनसॅट सॅटेलाईटचे प्रक्षेपण केले. इस्रोच्या 44.4 मीटर लांबीच्या पीएसएलव्ही-54 रॉकेट लाँचरने 321 टन वजनासोबत आकाशात झेप घेतली आणि ओशनसॅट-3 सॅटेलाईटसोबतच भूतानच्या एका उपग्रहासहित 8 नॅनो उपग्रहांचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. चालू वर्षात इस्रोचे हे पाचवे आणि शेवटचे मिशन होते. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांद्वारे सर्वात दीर्घकाळ चाललेल्या मिशनपैकी ते एक होते. इस्रोच्या पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल) रॉकेटचे हे 54वे मिशन होते. त्यामुळे इस्रोद्वारे या मिशनला पीएसएलव्ही सी-54 असे नाव दिले गेले.

पीएसएलव्ही-एक्सएल प्रारूपाचे हे 24वे मिशन होते. पीएसएलव्ही-54च्या माध्यमातून अंतराळात सोडण्यात आलेल्या आठ लघुउपग्रहांमध्ये ‘पिक्सेल’ या बंगळूरच्या खासगी कंपनीचा आनंद उपग्रह, हैदराबादमधील ‘ध्रुव’ या खासगी स्पेस कंपनीचे दोन थायबोल्ट उपग्रह, स्पेसफ्लाईट आणि अमेरिकेचे चार अ‍ॅस्ट्रोकास्ट उपग्रहही सामील होते. जवळपास एक हजार किलोग्रॅम वजनाच्या ओशनसॅट-3 सॅटेलाईटला इस्रोने ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट-6’ (ईओएस-06) असे नाव दिले आहे. ईओएस-06 आणि 8 नॅनो उपग्रहांचे मिळून एकूण वजन 1117 किलोग्रॅम होते. पीएसएलव्ही-सी 54 ने प्रक्षेपण केल्यानंतर 17 मिनिटांत ईओएस-06ला पृथ्वीपासून 742 किलोमीटर उंचीवर आपल्या कक्षेत पोहोचवले. अन्य आठ उपग्रहही आपल्या निर्धारित कक्षांमध्ये जवळपास 528 किलोमीटर उंचीवर स्थापित केले गेले. एकूण दोन तासांच्या वेळेत उड्डाण यशस्वीपणे पूर्ण झाले. इस्रोसाठी हे मिशन अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांद्वारे पहिल्यांदाच दोन कक्षांमध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. यामध्ये ऑर्बिट चेंज थ्रस्टर्सचा (ओसीटी) वापर करण्यात आला. ईओएस स्थापित झाल्यानंतर पीएसएलव्ही-सी 54 रॉकेटला पुन्हा जमिनीवर आणण्यात आले आणि अन्य आठ उपग्रह 513 ते 528 किलोमीटरवर स्थापित केले गेले.

संबंधित बातम्या

इस्रोद्वारे अंतराळाच्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये प्रस्थापित केलेल्या या उपग्रहांची वैशिष्टेही लक्षणीय आहेत. आनंद आणि थायबोल्ट हे खासगी स्पेस कंपन्यांचे भारतीय उपग्रह आहेत. त्यात पिक्सल कंपनीच्या ‘आनंद’ उपग्रहाचे एकूण वजन 16.51 किलोग्रॅम आहे. व्यावसायिक उपग्रह क्षमता आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी तो अंतराळात पाठविला आहे. ‘आनंद’ एक हायपरस्पॅक्ट्रल नॅनो सॅटेलाईट आहे. त्याची तरंगलांबी 150 पेक्षा अधिक आहे. यामुळे 10 पेक्षा कमी तरंगलांबी असणार्‍या आजच्या बिगर-हायपरस्पॅक्ट्रल उपग्रहांच्या तुलनेत अधिक विस्ताराने पृथ्वीची छायाचित्रे घेता येणार आहेत. पिक्सलच्या सीईओच्या म्हणण्यानुसार, ‘आनंद’ उपग्रह अत्यंत विस्तृतपणाने पृथ्वीचे अवलोकन करू शकतो. पिक्सेल आपला तिसरा हायपरस्पॅक्ट्रल उपग्रह प्रक्षेपित करण्याच्याही तयारीत आहे.

धु्रव स्पेस कंपनी या स्टार्टअपच्या थायबोल्ट-1 आणि थायबोल्ट-2 या दोन उपग्रहांचे एकूण वजन 1.45 किलोग्रॅम आहे. अ‍ॅस्ट्रोकास्टच्या रूपातील तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनासाठी अमेरिका स्पेसफ्लाईटकडून पाठविलेल्या 17.92 किलोग्रॅम वजनाच्या चार उपग्रहांचा इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) तंत्रज्ञानात उपयोग होईल. ‘भूतानसॅट’ हा भारत आणि भूतान या दोन्ही देशांनी संयुक्तपणे प्रक्षेपित केलेला उपग्रह आहे. तो एक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्टे्रटर आहे. अंतराळ क्षेत्रात भूतानला भारताद्वारे दिल्या जाणार्‍या सहकार्याचे उदाहरण म्हणून याकडे पाहावे लागेल. भूतानचा 30 सेंटीमीटर क्यूबिक नॅनो सॅटेलाईट ‘आयएनएस-2 बी’ हा 18.28 किलो वजनाचा असून, त्यात नॅनो एमएक्स आणि एपीआरएस-डिजिपीटर ही दोन उपकरणे बसविण्यात आली आहेत. ‘भूतानसॅट’मध्ये रिफोट सेन्सिंग कॅमेरे आहेत. म्हणजेच हा उपग्रह जमिनीची माहिती देणारा आहे. रेल्वे रुळ बनवणे, पूल बांधणे आदी विकासकामांसाठी या उपग्रहाचा वापर केला जाईल. यात मल्टिस्पेक्ट्रल कॅमेरादेखील आहे. म्हणजेच सामान्य छायाचित्रांबरोबरच वेगवेगळ्या प्रकाशलहरींच्या आधारे छायाचित्रे टिपली जातील.

ओशनसॅट मालिकेतील सॅटेलाईट हे ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’ आहेत. महासागर आणि वातावरणाच्या अभ्यासासाठी ते उपयुक्त ठरणारे आहेत. विशेषतः महासागरांवरील हवामानाबाबत पूर्वानुमान करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची उपयुक्तता अधिक आहे. ओशनसॅट सीरिजचा पहिला सॅटेलाईट ‘ओशनसॅट-1’ सर्वप्रथम 1999 मध्ये अंतराळात स्थापित करण्यात आला होता. त्यानंतर 2009 मध्ये ओशनसॅट-2 अंतराळात स्थापित करण्यात आला होता. 2016 मध्ये ओशनसॅट-2 चे स्कॅनिंग स्केटरोमीटर खराब झाले होते. त्यानंतर स्कॅटसॅट-1 लाँच करण्यात आला होता. अंतराळात स्थापित करण्यात आलेला ओशनसॅट-3 सॅटेलाईट अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण आहे. कारण, आधुनिक तंत्रज्ञान आणि कॅमेर्‍यामुळे ओशनसॅट-3 च्या मदतीने महासागरातील घटनांबाबत पूर्वानुमान लावणे शक्य होणार आहे. त्यानुसार कोणत्याही महासागरीय चक्रीवादळाबाबत अगोदरच माहिती मिळू शकेल. तसेच यामुळे समुद्रसपाटीचे तापमानही नोंदविता येणार आहे.

‘इस्त्रो’च्या उत्पन्नात भरीव वाढ

विशेष म्हणजे दिवसेंदिवस इस्त्रोच्या उत्पन्नातदेखील वेगाने वाढ होत चालली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 19 देशांच्या 177 परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. या व्यावसायिक प्रक्षेपणातून इस्रोने 1100 कोटींची कमाई केली आहे. देशोदेशीच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करणे हा आता या संस्थेच्या नियमित कामाचा एक भाग बनला आहे. कधी काळी भारताला आपले उपग्रह सोडण्यासाठी अन्य देशांवर अवलंबून राहावे लागत होते. काही देशांनी आपल्याला याविषयीचे तंत्रज्ञान द्यायलाही नकार दिला होता. त्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी हे आव्हानही पेलले आणि सार्‍या जगाला हे दाखवून दिले की, भारतसुद्धा अंतराळात यशस्वीपणे भरारी घेऊ शकतो.

– प्रा. विजया पंडित

Back to top button