आव्हान वाढत्या प्रदूषणाचे | पुढारी

आव्हान वाढत्या प्रदूषणाचे

आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन. वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण होणार्‍या धोक्यांविषयी समाजात जागृती निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या या देशात आज सर्व संसाधने प्रदूषित होत आहेत. वायू प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर आहे. प्रदूषणाच्या बाबतीत आज आपण जगात आघाडीवर आहोत.चीनमध्येही अशीच समस्या होती; परंतु त्यांनी ठोस कृती आराखडा तयार केला आणि त्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली. चीन हे करू शकतो तर आपण का नाही करू शकत? भोपाळ वायू दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 डिसेंबर रोजी भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना प्रदूषण रोखण्यास मदत करणार्‍या कायद्यांची जाणीव करून देणे, औद्योगिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि नियंत्रण याबाबत जागरूकता पसरवणे आणि औद्योगिक प्रक्रिया आणि मानवी निष्काळजीपणामुळे होणारे प्रदूषण रोखणे हा आ.हे

वास्तविक, वाढते वायूप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण हे आज जागतिक आव्हान बनले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या जीवनासाठी अत्यावश्यक पंचमहातत्त्वांपैकी कोणता घटक आज प्रदूषणापासून मुक्त राहिला आहे? हवा, माती, पाणी सारेच प्रदूषित झाले आहे. ही पंचमहातत्त्वे जीवनाचा मूलाधार आहेत. त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाच करता येत नाही. यापैकी कोणत्याही एका घटकाच्या अभावाने जीवन संपुष्टात येईल. भारताला हे सर्व घटक वारशाने विपुल प्रमाणात मिळाले आहेत. आपल्याकडे जंगले, पाणवठे, नद्या, पर्वत, माती, सुपीकता सारे काही होते. जीवनाचे आधार असलेले सर्व घटक येथे विपुल प्रमाणात असल्यामुळेच ते या भूमीच्या दिशेने पुन्हा पुन्हा येत राहिले.

नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या या देशात आज सर्व संसाधने प्रदूषित होत आहेत. वायू प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर आहे. सर्वेक्षणात दरवर्षी भारत प्रदूषणाचे नवनवीन विक्रम नोंदवीत आहे. प्रदूषणाच्या बाबतीत आज आपण जगात आघाडीवर आहोत. देशातील 63 टक्के लोकसंख्या अशा ठिकाणी राहते, जिथे हवेचा दर्जा निर्धारित पातळीपेक्षा खराब असतो. भारताने निश्चित केलेला निकष 40 मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर आहे. जागतिक प्रमाणाशी तुलना केल्यास तो 11 पट अधिक आहे. जागतिक मानकांनुसार देशातील 90 टक्के लोकसंख्या प्रदूषणाच्या विळख्यात असण्याची शक्यता आहे. 2013 पासून जगातील 44 टक्के प्रदूषण भारतात होत आहे. भूतान हा आग्नेय आशियातील एकमेव असा देश आहे की, जिथे नकारात्मक कार्बन फूटप्रिंट आहे. म्हणजेच भूतान जेवढा कार्बन उत्सर्जित करतो, त्यापेक्षा जास्त ती क्षती ऑक्सिजनने भरून काढली जाते.

आपल्याकडील प्रदूषणाचा बोजा भूतानवरही पडत आहे. जीडीपी, लोकसंख्या, क्षेत्रफळ, क्षमता या बाबतीत तो आपल्यापेक्षा खूपच लहान देश आहे; परंतु उत्तम नैसर्गिक संतुलन राखलेला हा देश आहे. आपली संस्कृती नद्यांच्या काठांवर विकसित झाली आहे. कारण, शेतीयोग्य माती आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे तेथे जीवन सोपे झाले. एका अहवालानुसार, गंगेच्या मैदानात जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या तुलनेत 21 पट अधिक वायू प्रदूषण आहे. या भागात देशाची बहुसंख्य लोकसंख्या राहते. घनदाट वस्तीमुळे तेथील लोकसंख्येचा मोठा भाग प्रदूषणाच्या विळख्यात आहे. लॅन्सेटच्या 2019 च्या अहवालानुसार, वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी सुमारे 1.6 दशलक्ष मृत्यू होत आहेत. हा आकडा एकंदरीत अकाली मृत्यूंच्या आकडेवारीच्या 17 टक्के आहे.

औद्योगीकरण हे वायू प्रदूषणाच्या प्रमुख तीन कारणांपैकी आहे. विकासासाठी ते आवश्यक आहे. मात्र, नियोजनशून्यतेमुळे अडचणी वाढल्या आहेत. शहराच्या मध्यभागी मोठा उद्योग उभारण्यासारख्या घटनांमुळे हवा प्रदूषित झाली. दुसरे म्हणजे आर्थिक विकासाच्या नावाखाली मोठे महामार्ग, कॉरिडॉर बांधले गेले. ते आवश्यकही आहे; पण त्यासाठी लाखो झाडे तोडण्यात आली. भरपाई म्हणून नवी झाडे लावण्याचे आश्वासन दिले गेले; परंतु ते पूर्ण होणार का, हा प्रश्न आहे. तिसरे प्रमुख कारण म्हणजे वाहनांची वाढती संख्या होय.
सन 2000 पासून रस्त्यांवरील वाहनांची संख्या चार पटींनी वाढली आहे. त्यामुळे प्रदूषण अधिक गंभीर बनले आहे.

गरज असेल तरच कार घ्या, असा स्वीडनमध्ये नियम आहे. एकाच ठिकाणी तीन दिवसांपेक्षा जास्त काळ वाहन उभे राहिल्यास त्यावर दंड आकारला जातो; परंतु याउलट आपल्या देशातील अनेक कुटुंबांकडे चार ते पाच वाहने आहेत. प्रदूषकांमध्ये पीएम 2.5 ची चर्चा होते; परंतु पीएम 10 वर मात्र चर्चा होत नाही. या प्रदूषणाची निर्मिती रस्त्याकडेच्या धुळीमध्ये होते. वायू प्रदूषणामुळे सरासरी आयुर्मान दोन ते अडीच वर्षांनी कमी झाले आहे. कर्करोगाचे आव्हान लक्षात घेऊन लोकांना दारू आणि सिगारेट सोडण्याचे आवाहन केले जाते; परंतु प्रदूषणासोबतच या सवयींमुळेही लोकांना धोका निर्माण झाला आहे.

– रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

Back to top button