हवा जाणिवेचा दिवा! | पुढारी

हवा जाणिवेचा दिवा!

दिवाळीच्या सणावर दोन वर्षे कोरोनाची काजळी असल्यामुळे प्रकाशाचा हा उत्सवही नेहमीच्या उत्साहाने साजरा झाला नव्हता. माणूस हा उत्सवप्रिय प्राणी असल्यामुळे कठिणातल्या कठीण परिस्थितीतही उत्सवप्रियता जपत असतो. तरीसुद्धा ज्या निर्भय वातावरणात उत्सव साजरा व्हायला हवा, तसा तो गेली दोन वर्षे होऊ शकला नाही. दिवाळीच नव्हे, तर इतरही सण-उत्सवांबाबत हेच घडले होते. दिवाळीची चर्चा अधिक अशासाठी की, दिवाळी हा अंधकार दूर सारून प्रकाशाकडे घेऊन जाणारा उत्सव असतो.

मनावरची काजळी झटकून टाकणारा उजेडाचा सण असतो. मोठ्या आर्थिक उलाढालीचा सण असतो. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांपासून हंगामी विक्रेत्यांपर्यंत अनेक छोट्या घटकांना आर्थिक दिलासा देणारा सण असतो. सणांवरील निर्बंधांमुळे या सगळ्याच गोष्टींवर बंधने आली होती, परिणामी उलाढाल मंदावली होती. उत्साहावर मर्यादा आल्या होत्या. मनावर भीतीचे सावट होते. गेल्या दोन वर्षांतील कटू स्मृती मागे टाकून यावर्षी मोठ्या उत्साहाने लोक दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. दिवाळीच्या आधी गणेशोत्सव आणि दसर्‍याचा सणही मोठ्या उत्साहाने साजरा झाला. त्या सणांवरही कोरोनामुळे बंधने आली होती आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सरकारी पातळीवरही अधिकची खबरदारी घेतली जात होती.

गणेशोत्सवापाठोपाठ येणारा दसरा शेतकरीवर्गाच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असतो. पावसाळा संपलेला असतो. पिकांची कापणी होऊन धान्य घरात आले असते. समृद्धी ओसंडून वाहत असते. अशा वातावरणात दसरा साजरा केला जातो. पावसाळ्याची किचकिच संपून थंडीचे आल्हाददायक पर्व सुरू झालेले असते आणि सगळीकडे उत्साह भरून वाहत असतो. अशा वातावरणात दिवाळीचे आगमन होते आणि बघता बघता घरातले आणि बाहेरचेही वातावरण बदलून जाते.

गणेशोत्सवापासून सुरू झालेला धार्मिक माहोल दसरा संपेपर्यंत कायम राहतो. दिवाळीला मात्र हा धार्मिक ज्वर ओसरून निखळ सणाचा आनंद भरभरून वाहत असतो. दिवाळीच्या याच वैशिष्ट्यामुळे दिवाळीला ‘सणांचा राजा’ म्हटले जाते. धार्मिक प्रथा, परंपरांच्या पलीकडे जाऊन सर्वधर्मीय लोक दिवाळीच्या उत्साहात सामील होत असतात. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. पारंपरिकरीत्या शुभकार्यासाठीचा उत्तम दिवस म्हणून त्याचे महत्त्व असते. बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणून भाऊबीजेचे महत्त्व आहे.

महाराष्ट्रासह हरियाणा, गुजरात, गोवा आदी राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्येही ‘भाईतिहार’ म्हणून या दिवशी बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव साजरा केला जातो. बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. नोकरी, व्यवसाय किंवा कौटुंबिक व्यवधानांमुळे व्यस्त असलेले कुटुंबीय यानिमित्ताने एकत्र येत असतात.

‘ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो,’ अशी प्रार्थना दिवाळी पाडव्याला केली जाते. आपला देश कृषिप्रधान आहे आणि बळीराजा हा या कृषी परंपरेचा अग्रदूत मानला जातो. आजही शेतकर्‍याला ‘बळीराजा’ असे संबोधले जाते, यावरून त्याचे कृषी संस्कृतीमधील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. याचा सरळ साधा अर्थ असतो की, शेतकर्‍यांची काळजी घेणारे राज्यकर्ते सत्तेवर यावेत. आजवर महाराष्ट्राच्या सत्तेत आलेल्यांपैकी ऐंशी टक्क्यांहून अधिक शेतकर्‍यांचीच मुले होती.

अलीकडच्या काळात प्रशासनामध्ये मंत्रालयातील कारकुनांपासून सचिवांपर्यंत आणि तहसीलदारांपासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत वेगवेगळ्या पदांवर शेतकर्‍यांचीच मुले स्थानापन्न होतात. अभिमान वाटावा अशी ही गोष्ट असली तरी शेतकर्‍यांची मुले सत्तेत आणि प्रशासनात गेल्यामुळे प्रत्यक्षात शेतकर्‍यांना त्याचा काय फायदा झाला, हा संशोधनाचा विषय ठरावा. शेतकर्‍यांची पिळवणूक कोणत्याही टप्प्यावर थांबलेली दिसत नाही. शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत चाललेले दिसतात आणि त्यांना कुणी वालीच उरलेला नाही, असे चित्र समोर येते.

राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी शेतकरी हा त्यांच्यासाठी राजकारणाचा विषय असतो; परंतु निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात आणि शेतकरी मागे ढकलला जातो. अधूनमधून कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात; परंतु त्यासाठीचे निकष इतके कठोर ठेवले जातात की, गरजू शेतकरी मदतीपासून वंचित राहतात. यंदा दिवाळीचा उत्साह शहरांमधून, बाजारपेठांमधून दिसत असला तरी खेडोपाडी दयनीय परिस्थिती आहे. परतीच्या पावसाने चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या महाराष्ट्राला दिलेल्या तडाख्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी काळवंडून टाकली आहे.

पिके कापणी करून घरात येण्याच्या वेळातच हा तडाखा बसल्यामुळे शेतकर्‍यांची पुरती वाताहत झाली आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करताना अवतीभवतीच्या या परिस्थितीचे भान ठेवायला हवे. दीपोत्सवामध्ये अंगणात दिवा लावत असताना मनातही जाणिवेचाही एक दिवा तेवत ठेवायला हवा, त्यातूनच दिवाळीच्या प्रकाशपर्वात आपले माणूसपण अधिक उजळून निघेल!

Back to top button