मुलायमसिंह यादव : लोहियावादाचे पुरस्कर्ते | पुढारी

मुलायमसिंह यादव : लोहियावादाचे पुरस्कर्ते

थोर समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जाणारे मुलायमसिंह यादव हे स्वातंत्र्योतर भारतीय राजकारणातील एक प्रदीर्घ अनुभव असणारे नेते होते. केंद्रातील सत्तेचा राजमार्ग असणार्‍या उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या राज्यातून आठवेळा विधानसभा सदस्य आणि सातवेळा लोकसभा सदस्य आणि मुख्यमंत्री राहिलेला हा नेता एकेकाळी केंद्रातील सत्तेचा किंगमेकर होता. कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानकीमध्ये मैदान मारलेल्या मुलायमसिंहांनी राजकीय आखाड्यातही अनेक दिग्गजांना चितपट केले होते. त्यांच्या जाण्याने लोहियावादाचा एक कट्टर पुरस्कर्ता हरपला आहे.

स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणात प्रदीर्घ काळ सक्रिय राहिलेल्या ज्येष्ठ-बुजुर्ग आणि प्रभावी नेत्यांमध्ये समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचा समावेश होता. तब्बल साडेपाच दशके चाललेल्या मुलायमपर्वाची अखेर सांगता झाली आहे. थोर समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांच्यासोबत काँग्रेसविरोधी लढ्यात उतरून मुलायमसिंहांनी समाजवादाची कास धरली. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव हे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राममनोहर लोहिया यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात. राममनोहर लोहिया यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजवादी विचारांचे मोठ्या निष्ठेने पालन केले. हे करीत असताना जनसामान्यांशी असलेली बांधिलकी त्यांनी कायम राखण्याचा प्रयत्न केला. चौधरी चरणसिंह यांच्या सहाय्याने त्यांनी राजकारणातील डावपेच आत्मसात केले. या डावपेचांमुळेच कुस्तीच्या आखाड्यात पैलवानकी गाजवणारे मुलायमसिंह राजकीय आखाड्यातसुद्धा अनेकांना चितपट करणारे ठरले. अनेक रथीमहारथी राजकीय नेत्यांना त्यांनी धूळ चारली मुलायमसिंहांची राजकीय कारकीर्द अनेक अर्थांनी गाजली. केंद्रातील सत्तेचा राजमार्ग असणार्‍या उत्तर प्रदेशसारख्या आकारमानाने सर्वांत मोठ्या राज्याचे तीनवेळा मुख्यमंत्रिपद साभाळलेल्या मुलायमसिंह यांनी अथक परिश्रम करून समाजवादी पक्षाचा विस्तार केला. केंद्रात वजन असणारा नेता, अशी त्यांची उत्तर प्रदेशसह देशभरात ख्याती होती. त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणूनही पदभार सांभाळला. मात्र, क्षमता असूनही पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत त्यांना शेवटपर्यंत पोहोचता आले नाही.

नत्थू सिंह यांना मुलायमसिंह यांचे राजकीय गुरू मानले जाते. सुरुवातीपासूनच त्यांनी मुलायमसिंह यांच्यातील गुण हेरले होते. विशेषतः मुलायमसिंहांच्या पैलवानकीने त्यांना प्रभावित केले होते. मुलायमसिंह यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही जसवंतनगर या नत्थू सिंह यांच्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून केली. 1967 मध्ये नत्थू सिंह यांनी स्वतः राममनोहर लोहिया यांना जसवंतनगरचे तिकीट मुलायमसिंह यांना देण्यास सांगितले होते. या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंह यांनी बलाढ्य काँग्रेस पक्षाच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला. वयाच्या 28 व्या वर्षी सर्वात तरुण आमदार म्हणून मुलायमसिंह उत्तर प्रदेशात निवडून आले.

संबंधित बातम्या

मुलायमसिंह यादव यांना 27 जून 1975 रोजी अटक करण्यात आली. भालेपुरा नावाच्या गावात जमिनीचा वादविवाद मिटवण्यासाठी ते गेले होते. पंचायत बैठकीच्या दरम्यान पोलिसांनी गावाला चहुबाजूंनी वेढा घातला आणि मुलायमसिंह यांना ‘मिसा’अंतर्गत अटक केली. जानेवारी 1977 पर्यंत जवळपास 18 महिने मुलायमसिंह इटावाच्या तुरुंगात होते. या दरम्यान त्यांचे सर्व कामकाज त्यांचे भाऊ शिवपाल यादव सांभाळत होते. तुरुंगातून त्यांचा संदेश समर्थकांपर्यंत पोहोचविण्याचेही काम शिवपाल यांनी केले होते.

आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी आणि काँग्रेस यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले होते. 1977 च्या निवडणुकांमध्ये जनता पक्ष उदयाला आला होता. देशात मोरारजी देसाई यांचे सरकार आले तेव्हा त्यांनी अनेक राज्यांतील काँग्रेसची सरकारे बरखास्त केली होती. उत्तर प्रदेशातही निवडणूक झाली आणि राम नरेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात मुलायमसिंह यांना स्थान देण्यात आले. त्यांच्याकडे सहकार हे खाते सोपविण्यात आले. अशाप्रकारे 1977 मध्ये मुलायमसिंह यादव पहिल्यांदा मंत्री बनले. यानंतर 1980 मध्ये त्यांची लोक दलाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. हा पक्ष नंतर जनता पक्षाचा भाग झाला. 1982 मध्ये मुलायमसिंह यांची उत्तर प्रदेश विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली.

राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादाने संपूर्ण देशाच्या राजकारणाचा पट बदलून टाकला. या आंदोलनातील कारसेवकांवर गोळ्या घालण्याचे आदेश देऊन मुलायमसिंहांनी अप्रत्यक्षपणे भाजपला संजीवनी देण्याचे काम केले होते. त्यानंतर घडलेल्या घडमोडींनंतर 1992 मध्ये जनता दलातून बाहेर पडून त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1995 मध्ये मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेल्यानंतर मुलायमसिंह राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. 1996 मध्ये मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून 11 व्या लोकसभेत निवडून गेले. त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. अशा त्रिशंकू स्थितीत मुलायमसिंह किंगमेकर बनले. तिसर्‍या आघाडीच्या सरकारमध्ये ते स्वतः संरक्षणमंत्री बनताना आपल्या पक्षाच्या अनेक नेत्यांना त्यांनी मंत्रिपदे मिळवून दिली. हा कार्यकाळसुद्धा दीर्घकाळ चालला नाही. कारण, 1998 मध्ये केंद्रातील हे सरकार कोसळले. त्यानंतर मुलायमसिंह 29 ऑगस्ट 2003 रोजी तिसर्‍यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आणि 11 मे 2007 पर्यंत राज्यातील सत्ता सांभाळली. आता मुलायमसिंहांकडून राजकारणाचे बाळकडू घेतलेले अखिलेश यादव त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. या वाटचालीत त्यांना आपल्या पित्याची उणीव सदोदित जाणवत राहील. मुलायमसिंह यांच्या निधनाने तब्बल आठवेळा विधानसभा सदस्य राहिलेला आणि सातवेळा लोकसभा सदस्य राहिलेला अनुभवी नेता हरपला आहे.

– विश्वास सरदेशमुख, ज्येष्ठ पत्रकार

Back to top button