लवंगी मिरची : खेळातही राजकारण? | पुढारी

लवंगी मिरची : खेळातही राजकारण?

‘तुमचा नातू दिसला नाही खूप दिवसांत.’
‘नर्व्हसनेसपणागिरी वाढल्याने घरीच बसून राहिलाय पठ्ठ्या.’
‘कशाने आलीये एवढी नर्व्हसनेसपणागिरी?’
‘कॅच सुटल्यापासून.’
‘आरारारा! कुठल्या मॅचमध्ये सोडला म्हणे त्याने कॅच?’
‘त्याने नाही हो सोडला. मुळात त्याला एखाद्या मोठ्या, महत्त्वाच्या मॅचमध्ये घेतंय कोण?’
‘मग कोणत्या कॅचबद्दल बोलताय तुम्ही?’
‘मागच्या रविवारची दुबईची एशिया कप मॅच नाही का? तिच्यात पाकिस्तानने आपल्याला हरवलं ती?’
‘हं हं, ती होय? तिच्यात त्या अर्शदीपसिंगने सोडला खरा एक साधासा कॅच. सुटला त्याच्या हातून.’
‘पण केवढ्याला पडलं ते? ही काय वेळ होती कॅच सोडण्याची?’
‘अहो, तशी तर मॅचमध्ये कोणतीच वेळ कॅच सोडण्याची नसते बरं का! कोणीही खेळाडू, ठरवून, मस्तपैकी कॅचेस सोडायला, ष्टंपा उडवून घ्यायला वगैरे ग्राऊंडवर जात नसतो. प्रत्येकाला चांगली कामगिरी करावीशी वाटत असणारच ना शेवटी?’
‘पण, नुसतं वाटून काय उपयोग? ऐन मोक्याला माती खाल्लीच ना? आमच्या नातवाने आणि त्याच्या मित्रांनी त्याला झोड झोड झोडला त्या व्हॉटस्प की कशावर.’
‘खूपच लोकांनी घेतलंय त्याच्यावर तोंडसुख. कुठल्या तरी शहरात त्याची प्रतिमा जाळली म्हणे भर चौकात. दसर्‍याला रावणदहन करतात तसं.’
‘काय हे? कुठे रावणाची पापकृत्यं? आणि कुठे एक चेंडू हातातून सुटणं?’
‘लोकांच्या अपेक्षा असतात खेळाडूंकडून. स्वप्नं असतात विजयाची. त्यांचा भंग सहन होत नाही लोकांना.’
‘म्हणून चक्क जाळपोळ? विषारी टीका? थेट हेतूंबद्दलच शंका घेणं?’
‘आपलं वैशिष्ट्यं आहे ते. प्रेम करू तेव्हा अशा खेळाडूंची देवळं बांधू. त्यांच्या प्रतिमांना हारबीर घालू. चिडलो तर जाळपोळीवर उतरू!’
‘रिकामटेकडेपणा आहे सगळा.’
‘आपल्याला आपला देश हरलेला बघवत नाही, सगळं देशप्रेम बरं देशप्रेम!’
‘तो आणखी एक वेगळाच मुद्दा असतो आपल्याकडे. आपण पटकन कशालाही राजकीय रंग देतो.’
‘तो कसा काय?’
‘गेल्या ऑक्टोबरमध्ये टी-ट्वेंटीमध्ये आपण पाकिस्तानसमोर मॅच हरलो. त्या महंमद शामीची झाली काहीतरी चूक. लगेच त्याला पाकधार्जिणा ठरवून आपण मोकळे!’
‘मग? काय चूक होतं त्यात?’
‘अहो, सगळंच चूक होतं. राष्ट्रीय खेळाडू केवढे कष्ट करून, केवढ्या स्पर्धेला तोंड देऊन त्या स्थानावर पोहोचलेले असतात. मुद्दाम देशद्रोह करण्यासाठी ते एवढं रक्त आटवतील का?’
‘मग काय काठावर मॅच गमावल्याबद्दल सत्कार करायचा त्यांचा?’
‘नक्कीच नाही. पण, टीका केली तरी ती विधायक असावी. खेळाडूचं पुरतं खच्चीकरण करणारी नसावी. खेळाडू काय, स्टार मंडळी काय, ते देवही नसणार आणि परराष्ट्रांचे हेरही नसणार, हे कधी समजून घेणार आपण?’
‘असं म्हणता? बरं, सांगून बघतो नातवाला.’
‘त्याला म्हणावं, बाबा रे, एकदा गल्लीच्या क्रिकेट टीममध्ये तरी निवडून येऊन दाखव. आम्ही टाळ्या वाजवायला तरी नक्की येऊ. फुलांचा हार घालायचा किंवा खेटरांची माळ घालायची हे दोन्ही टाळण्याचं महत्त्व तेव्हा कळेल तुला.’

– झटका

Back to top button