संयुक्‍त राष्ट्रातील महिलाशक्‍ती | पुढारी

संयुक्‍त राष्ट्रातील महिलाशक्‍ती

परराष्ट्र सेवेतील अधिकारी रुचिरा कंबोज यांची संयुक्‍त राष्ट्राच्या भारताच्या कायम प्रतिनिधीपदी नेमणूक करण्यात आली असून, अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारणार्‍या त्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या आहेत. देशात राष्ट्रपतिपदी ओडिशाच्या द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सक्षमीकरणाची व्याप्‍ती वाढत असताना आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला गेला आहे. परराष्ट्र सेवेतील अधिकारी रुचिरा कंबोज यांची संयुक्‍त राष्ट्राच्या भारताच्या कायम प्रतिनिधीपदी नेमणूक करण्यात आली असून अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारणार्‍या त्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या आहेत. न्यूयॉर्क येथील संयुक्‍त राष्ट्राच्या मुख्यालयात त्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहतील. 1987 च्या बॅचच्या रुचिरा यांनी सध्याचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरूमूर्ती यांचे स्थान घेतले आहे.

रुचिरा या सध्या भूतानमध्ये पहिल्या महिला राजदूत म्हणून कार्यरत होत्या. यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत भारताच्या उच्चायुक्‍त आणि युनेस्कोमध्ये राजदूत म्हणून पदभार सांभाळला आहे. एक ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारणार्‍या रुचिरा कंबोज यांनी ट्विट करत म्हटले, की संयुक्‍त राष्ट्रात भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून आपण न्यूयॉर्क येथे पोहोचलो आहोत. या नव्या पदाच्या माध्यमातून देशसेवा करणे ही खूप मोठी अभिमानास्पद बाब आहे. 2002 ते 2005 या काळात त्यांनी न्यूयॉर्क येथे संयुक्‍त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनमध्ये कौन्सिलर म्हणून काम केले होतेे.

1987 च्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत अखिल भारतीय पातळीवर महिलांत त्या सर्वोच्च स्थानी राहिल्या. परराष्ट्र सेवा बॅचमध्ये टॉपर राहिलेल्या रुचिरा कंबोज यांनी पॅरिस येथून राजनैतिक प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी 1989-91 या काळात फ्रान्समध्ये भारतीय दूतावासात तिसरे सचिव म्हणून काम केले. दिल्लीत परतल्यानंतर त्यांनी 1991-96 या काळात परराष्ट्र मंत्रालयात ‘युरोप वेस्ट डिव्हीजन’मध्ये मुख्य अवर सचिव म्हणून काम केले आहे. 1996-99 या काळात त्यांनी मॉरिशस येथे पहिले सचिव (आर्थिक आणि वाणिज्यिक) आणि पोर्ट लुईस येथे भारतीय उच्चायुक्‍तालयात काम केले. रुचिरा यांनी जुलै 2017 ते मार्च 2019 या काळात ‘किंगडम ऑफ लेसोथो’ आणि दक्षिण आफ्रिकेत भारताच्या उच्चायुक्‍त म्हणून काम केले. 17 मे 2019 पासून भूतान येथे भारतीय दूत म्हणून त्या कार्यभार सांभाळत होत्या.

सुरक्षा परिषदेत भारताचा अस्थायी सदस्यत्वाचा कार्यकाळ यावर्षी डिसेंबरमध्ये संपत आहे. त्याचवेळी डिसेंबर महिन्यात भारत संयुक्‍त राष्ट्राचे अध्यक्षपद भूषवणार आहे. रुचिरा कंबोजचे दिवंगत वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. त्यांची आई दिल्ली विद्यापीठात संस्कृताच्या प्राध्यापक राहिल्या आहेत. आता त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. रुचिरा यांचा विवाह उद्योगपती दिवाकर कंबोज यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगी आहे. त्यांचे शालेय शिक्षण दिल्ली, बडोदा आणि जम्मूत झाले. त्यांनी मसुरीच्या ‘वाईन बर्ग अ‍ॅलन स्कूल’मधून शिक्षण घेतले आहे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून पदवी प्राप्‍त केली. हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांवर त्यांची चांगली पकड आहे. भारताचा संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील दोन वर्षांचा अस्थायी सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या डिसेंबरमध्ये संपत असतानाच रुचिरा कंबोज यांच्याकडे स्थायी प्रतिनिधीपदाची जबाबदारी आली आहे. एवढेच नाही तर डिंसेबरमध्ये भारत संयुक्‍त राष्ट्राचे अध्यक्षपद भूषवत असून तेथेही रुचिरा कंबोज यांची भूमिका महत्त्वाची राहील.

– विधिषा देशपांडे

Back to top button