बुवाबाजीचा करकचणारा विळखा | पुढारी

बुवाबाजीचा करकचणारा विळखा

श्रद्धा ही महत्त्वाची असते; पण अंधश्रद्धा मात्र माणसाचा घात करते. खरे साधू, खरे योगी, खरे सिद्धपुरुष यांची गोष्ट वेगळी. मंत्र-तंत्र, अघोरी विद्या यांच्या साहाय्याने लोकांना लुबाडणार्‍या भोंदूंच्या कार्यपद्धतीचा मोठा फटका समाजाला बसत आहे. मानवत ते म्हैसाळ अशी अनेक उदाहरणे भोंदूंच्या ढोंगावर प्रकाश टाकतात.

आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकांना गंडा घालणार्‍या अनेक टोळ्या सध्या फोफावलेल्या आहेत. त्या टोळ्या असतात. एकटा- दुकटा माणूस नसतो. तथाकथित मांत्रिकांच्याही टोळ्या असतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अगदी पुसट असते. श्रद्धा संपून अंधश्रद्धा कधी सुरू होते, हे त्यात गुरफटत जाणार्‍या माणसाला समजतदेखील नाही. याचा गैरफायदा मांत्रिक घेतात. माणसाला आपल्या जाळ्यात ओढून त्याला पूर्णपणे लुटणार्‍या अशा टोळ्या आज एकविसाव्या शतकाची बावीस वर्षे संपत आली, तरी जास्त जोमाने फोफावत असल्याचे दिसून येत आहे.

समाज जेवढा अधिकाधिक शिक्षित आणि सुशिक्षित होऊ लागलेला आहे, तितकाच तो कसल्या ना कसल्या हव्यासापोटी भोंदू, मांत्रिकांच्या नादाला लागणार्‍या लोकांनीही भरलेला आहे. लोकांच्या मनात अस्थिरतेची भावना आहे, कमालीची अस्वस्थता आहे. जगण्याच्या बाबतीतली असुरक्षितता आहे, तसेच अतिहव्यासही आहे. विवशता असो की हव्यास त्यातूनच भोंदू, मांत्रिकांच्या आमिषाला ते बळी पडू लागले आहेत.

संबंधित बातम्या

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावात एका सुशिक्षित कुटुंबातील नऊ जणांची मांत्रिकाच्या नादाला लागून कशी धुळधाण झाली, त्या सर्वच्या सर्व नऊ लोकांना कसे बळी पडावे लागले, ही दुर्घटना ताजीच आहे. गुप्तधनाच्या मोहाला बळी पडून ‘बळी’ जाणार्‍या लोकांची संख्या समाजात कमी नाही. समाज श्रद्धाळू आहे, भाविक आहे. तसा तो असण्यात चुकीचे काहीच नाही; पण श्रद्धेची लक्ष्मणरेषा ओलांडून माणूस अंधश्रद्धेच्या विश्‍वात शिरला की, त्याचा र्‍हास हा ठरलेलाच आहे. घरात दडलेले गुप्तधन शोधून काढतो अशा भूलथापा देऊन वनमोरे या सुशिक्षित कुटुंबाला एका मांत्रिकाने आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळून गुप्तधन शोधण्याचे ढोंग त्या मांत्रिकाने केले.

गुप्तधन मिळण्याच्या लोभापायी त्या कुटंबाने सावकाराकडून कोट्यवधी रुपये व्याजावर आणले. मांत्रिकाने आमिष दाखवले खरे; पण गुप्तधन तो काढून देऊ शकला नाही. मग, सावकारांनी त्या कुटुंबीयांकडे वसुलीचा तगादा लावला आणि वनमोरे यांनी मांत्रिकाकडे लावला. त्यातूनच त्या सर्व कुुटुंबाची हत्या करण्यात आली. प्रश्‍न असा आहे की, गुप्तधन असतेच, तर त्या कुटुंबाच्या घराचा पाया काढतानाच ते दिसायला हवे होते. जुन्या वाड्यांच्या भिंती, किल्ल्यांचे बुरुज यांच्यात आपल्या पूर्वजांनी लपवून ठेवलेले धन वंशजांना सापडू शकते, ते काही गुप्तधन नसते. हे आपण समजू शकतो; पण घराच्या खाली गुप्तधन येणार तरी कुठून, हा साधा प्रश्‍न वनमोरे कुटुंबीयांना का पडला नसेल?

अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी स्वत: समाजाचे मार्गदर्शक असतानासुद्धा आत्महत्या केली. त्यांना स्वत:ला जीवनाचा अंत कसा आणि कधी होणार, हे कळले नसेल का? काही दिवसांपूर्वीच मानवगुरू म्हणवून घेणार्‍या चंद्रशेखर यांची हत्या झाली. जे समाजाला संकटावर मात करण्याचे तोडगे देत होते, त्यांना स्वत:ची हत्या का टाळता आली नाही, असे अनेक प्रश्‍न विवेकवादी लोकांच्या मनात निर्माण होतात.

2003 मध्ये घडलेले नांदोस हत्याकांड आपण अजून विसरलेलो नाही. अंधश्रद्धेतून झालेल्या त्या हत्याकांडात तब्बल 10 जणांचा बळी गेला होता. 20 डिसेंबर 2003 ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुर्गम नांदोसच्या डोंगरात पोलिसांना 10 मृतदेह सापडले. तपासाचे धागेदोरे नवी मुंबईपर्यंत पोहोचले. अंधश्रद्धेमुळेच नवी मुंबईतल्या माळी कुटुंबातले चौघे आणि इतर सहा जणांची हत्या झाल्याचे समोर आले. मूळचा सिंधुदुर्गचा रहिवासी संतोष चव्हाण मुंबईत रिक्षा चालवत होता.

पैशांचा पाऊस पाडणार्‍या मांत्रिकाची भेट घडवून देतो, असे माळी कुटुंबाला संतोषने सांगितले. त्यांंना मालवणमधील नांदोसच्या डोंगरावर नेऊन पैशाचा पाऊस पाडतो, असे सांगून त्यांची हत्या करून त्यांच्याकडील पैसे लुटले. नोटा रिझर्व्ह बँक छापते. त्या नोटांची एकेक मालिका असते, प्रत्येक नोटेवर वेगळा क्रमांक असतो. गव्हर्नरची स्वाक्षरी असते. आकाशातून पडणार्‍या नोटांवर हे तपशील कुठून येतील? आकाशात नोटा तयार तरी कशा होतील, असे प्रश्‍न मुंबईसारख्या महानगरात राहणार्‍या लोकांना पडले नसतील का?

त्याच्याही पूर्वी घडलेले भयानक प्रकरण म्हणजे मानवत हत्याकांड. 1970 च्या दशकात मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मानवत इथल्या रुमिणी नावाच्या बाईने हे हत्याकांड घडवून आणले. तिला मूल होत नव्हते म्हणून सहकार्‍यांच्या मदतीने पिंपळावरच्या मुंजाला बळी देण्यासाठी तिने अत्यंत क्रूर पद्धतीने दहा- बारा वर्षे वयाच्या बारा मुलींचे आणि एका मुलग्याचा खून मांत्रिकाच्या सांगण्यावरून केले, तरीही तिला दिवस गेले नाहीत. या क्रौर्याने सगळा महाराष्ट्र हादरला. मांत्रिकांच्या अशा कारवायांना सामान्य लोक सहजी वश होणे हे समाजाचे दुर्दैव आहे.

अलीकडे काही वर्तमानत्रात (‘पुढारी’ नव्हे) आणि फेसबुकसारख्या समाजमाध्यमांतून मांत्रिकांनी आपले जाळे पसरलेले आहे. गरजू लोक त्यांच्याशी संपर्क साधतात आणि अधिकाधिक गाळात रुतत जातात. अवघ्या दोन- सव्वादोन हजारांपासून सुरू झालेली लूटमार लाखो-कोटी रुपयांच्या घरात केव्हा पोहोचते हे माणसाला कळतसुद्धा नाही, इतक्या लबाडीने भोंदूबाबा माणसाला लुटतात. त्यांची कार्यपद्धती कशी असते, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ईश्‍वरी आणि सैतानी शक्‍तीशी मंत्र-तंत्राने जो संपर्क साधू शकतो, त्याला व्यवहारात मात्र अत्याधुनिक विज्ञान- तंत्रज्ञानाची काय गरज असते, हा प्रश्‍न ज्याने – त्याने स्वतःला विचारायला हवा.

फसवणूक हा आजच्या समाजातील भोंदूंचा मूलमंत्र झाला आहे. भीतीने, असाहाय्यतेने, हव्यासाने, अस्वस्थतेने अशा भोंदूंच्या जाळ्यात सापडणार्‍या लोकांची संख्या कमी नाही. समाजमाध्यमांतून आवाहन करून, जाहिराती करून लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना पिळून काढण्याचा हा धंदा आता तेजीत आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती व्यापक प्रबोधनाची. सरकार किंवा शासन यंत्रणा यावर एकटी काही करू शकणार नाही. त्यासाठी समाजानेच पुढे येऊन लबाडांच्या टोळ्यांना रोखायला हवे. मुख्य म्हणजे सदैव सावध आणि सतर्क राहायला हवे.

श्रीराम ग. पचिंद्रे

Back to top button