महाप्रतापी राणा प्रताप | पुढारी

महाप्रतापी राणा प्रताप

भारतीय इतिहासात महाराणा प्रतापसिंहांचे नाव नेहमीच साहस, शौर्य, त्याग आणि हौतात्म्य यासाठी प्रेरणादायी ठरलेले आहे. मेवाडच्या सिसोदिया घराण्यात राणा हमीर, बाप्पा रावळ, राणा संग असे अनेक शूरवीर होऊन गेले. या सर्व वीरांना ‘राणा’ असे संबोधिले जातेच; पण प्रतापसिंहांना ‘महाराणा’ ही उपाधी मिळाली.

महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म इ. सन 1540 मध्ये झाला. मेवाडचे राणा द्वितीय उदयसिंह यांना अनेक अपत्ये होती. या सर्वात ज्येष्ठ प्रताप. स्वाभिमान व सदाचार हे त्यांचे मुख्य गुण होते. प्रतापे बालपणापासूनच धीट आणि शूर होते. स्वातंत्र्य या शब्दाचा पर्यायच प्रतापसिंह व्हावा, असे त्यांचे तेजस्वी जीवन होते. प्रतापसिंहांच्या तेजाने केवळ राजपुतानाच नव्हे तर सारा भारत देश प्रभावित झाला. महाराणा प्रतापसिंहांचे नाव आजही राजस्थानात पूज्य मानले जाते. महाराणा प्रतापसिंहांनी अकबरसारख्या बलाढ्य बादशहाशी मेवाड आणि राजपुताना यांच्या स्वातंत्र्यासाठी 25 वर्षे लढा दिला. या लढ्यात त्यांना पत्नीला घेऊन मुलाबाळांसोबत जंगलात भटकावे लागले. मातृभूमीसाठी, मेवाडचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाला तोड नाही. हे सारे कष्ट सोसत असतानाही त्यांनी कुळाला आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू दिला नाही.

त्याकाळी दिल्लीच्या तख्तावर अकबर बादशहा होता. हिंदूंमधील फुटीरता आणि स्वार्थ, लोभ याचा लाभ घेत त्याने बहुतेक सर्व राजपुतांना वश करून घेतले. काही राजपूत राजांनी मानसन्मानाच्या लालचीने मुलींनाही अकबराच्या अंत:पुरात पोहोेचविले होते; पण अशाही परिस्थितीत मेवाड, बुंदेलखंड आणि सिरही वंशातील काही राजे स्वाभिमान, धर्म आणि स्वतंत्रता टिकवून ठेवण्यासाठी अकबराशी प्राणपणाने लढत होते. पुढे उदयसिंह मेवाडचे राजा झाले. त्यांचे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या सामर्थ्याचा अपमान होय, असे अकबराला वाटे. त्याने खूप मोठी सेना पाठवून चितोडवर आक्रमण केले. उदयसिंह प्रथमपासूनच विलासी जीवनात रंगले होते. जीव वाचवण्याकरिता ते चितोड सोडून पळून गेले. आरवली पर्वतावर उदयपूर नावाची त्यांनी नवी राजधानी वसविली. चितोडच्या युद्धानंतर चार वर्षांनी म्हणजेच 3 मार्च 1572 रोजी उदयसिंहांचे निधन झाले.

संबंधित बातम्या

प्रतापसिंहांचा राज्याभिषेक झाला. प्रतापसिंह हे राणा प्रतापसिंह म्हणून आले होते. मातृभूमीवर लागलेल्या पारतंत्र्याचा कलंक नेहमीसाठी धुऊन टाकायचा आहे. शक्तिशाली राजपुतांनो, पुढे व्हा आणि स्वातंत्र्य मिळविण्याची तयारी करा, ही ओजस्वी वाणी व प्रतापसिंहांची कठोर प्रतिज्ञा उपस्थित असलेल्या सर्व सरदारांच्या अंत:करणात उत्साहाची लहर उमटवून गेली. एकमुखाने त्यांनी घोषणा केली की, हे प्रभो, आमच्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही चितोडच्या मुक्तीसाठी राणा प्रतापसिंहांना सहाय्य करू व त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढू. आम्ही मरण पत्करू; पण ध्येयापासून हटणार नाही. राणाजी, आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे आहोत, याची खात्री ठेवा. केवळ आपल्या इशार्‍याचाच अवकाश की,आम्ही आत्मसमर्पण करायला तयार आहोत.

हळदीघाटच्या युद्धात अकबराच्या अपेक्षेनुसार निर्णायक निकाल लागला नाही. अकबराचे सैन्य प्रतापसिंहांचा पूर्णपणे पाडाव करण्यात अयशस्वी ठरले. महाराणा प्रतापसिंहांनी सैन्यात क्षात्रतेज आणि बळ निर्माण केले व सैन्याची वाढ करून संपूर्ण मेवाड प्रांत कब्जात घेतला. हे कळल्यावरही अकबर बादशहाला शांतच राहावे लागले. पुन्हा महाराणा प्रतापसिंहांशी संघर्ष करण्याचे धाडस त्याने केले नाही. नंतर अकबर बादशहाने आपले सारे लक्ष दक्षिणेकडे वळविले; परंतु एवढ्या विजयानंतरही महाराणा प्रतापसिंहांचे समाधान झाले नाही. त्यांची दृष्टी चितोडवर होती. चितोड मोगलांच्या ताब्यात राहणे, हे त्यांना खटकत होते. प्रतापसिंहांचे साहस, शोर्य, चातुर्य व महापराक्रम बघून झालोर, जोधपूर, इडर, नोडोल व बुंदेलचे राजे त्यांच्या सहाय्यार्थ धावून आले व अकबर बादशहाच्या विरोधात उभे राहिले. प्रतापसिहांचे दूत सर्वदूर या संघर्षाचा वणवा पेटवित होते. एकामागून एक पर्वतासमान संकटे येत होती व त्यांच्याशी टक्कर देऊन मार्ग काढण्यात महाराणा प्रतापसिहांचे शरीर जर्जर झाले होते. 19 जानेवारी 1597 रोजी त्यांचे निधन झाले.

– श्रीकांत देवळे

Back to top button