कोरोना : अधिक दक्षता गरजेची | पुढारी

कोरोना : अधिक दक्षता गरजेची

- डॉ. ललित कांत (लेखक आयसीएमआरच्या संक्रमण विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

सध्या देशातील 54 जिल्ह्यांत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कोरोनाबाधितांची संख्या खूपच कमी किंवा असून नसल्यासारखी असेल, तर लोकांनी आपल्या भागातील कोरोनाचे संकट टळले, या अविर्भावात राहू नये. काही भागांत संक्रमण न झाल्याने किंवा लस न घेतल्याने अँटिबॉडी तयार न झालेल्या लोकांची संख्यादेखील खूप आहे.

कोरोनाची दुसरी लाट तीव्र असताना मे महिन्यात दररोज सुमारे चार लाख प्रकरणे समोर येत होती आणि सरासरी चार हजार लोकांचा मृत्यू होत होता. सध्याचे वातावरण पाहता ज्या वेगाने कोरोनाबाधितांची संख्या वाढली, त्याच वेगाने घट झाली आहे, असे वाटत आहे. परंतु, हे भ्रामक वातावरण आहे. जून महिन्यात संसर्गाच्या प्रमाणात खूपच घट झाली. जुलै महिन्यात हाच आकडा चाळीस हजारांच्या आसपास राहिला. आता देशभरातील 22 जिल्ह्यांत संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आले. यातील सात जिल्हे हे केरळचे आहेत, तर उर्वरित ईशान्य भारतातील आहेत. सध्या देशातील 54 जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या दराचा अर्थ म्हणजे जर दहा लोकांची तपासणी झाली, तर एक व्यक्‍ती बाधित असल्याचे निष्पन्‍न होईल. यात दहा जिल्हे केरळचेच आहेत. उर्वरित ईशान्य भारतातील आहेत.

संसर्ग वाढण्याचे विशेष असे ठोस कारण नाही. परंतु, निर्बंधात शिथिलता दिल्यामुळे संसर्ग वाढल्याचे सांगितले जात आहे. आकडेवारीवरून आणखी एक गोेष्ट स्पष्ट होते की, अधिक दर असलेल्या भागांत एका बाधित व्यक्‍तींकडून अधिक लोक बाधित होत आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमधील नियंत्रणांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. लसीकरणाचा वेगही वाढायला हवा. लस उपलब्ध होत नसेल, तर किमान एक डोस देणेदेखील आवश्यक आहे. आयसीएमआरच्या सिरो सर्वेक्षणानुसार आपली दोन तृतियांश लोकसंख्या कोरोना संसर्गाच्या सावटाखाली आली आणि त्यात अँटिबॉडी तयार झाली. सहा वर्षांपेक्षा अधिक वयागेटातील मुलांच्या एकूण लोकसंख्येच्या 62 टक्के जणांत अँटिबॉडी आढळली. लस घेतल्यामुळे अनेकांत रोगप्रतिकारक शक्‍ती निर्माण झाली. परंतु, याचा अर्थ असा नाही पहिला डोस घेतलेला व्यक्ती हा संसर्गापासून संपूर्णपणे सुरक्षित आहे. अँटिबॉडी कितपत सक्षम आहे, यासाठी वेगळी तपासणी करणे गरजेचे आहे. यावरून आपण संसर्गाच्या संपर्कात आलो की नाही, हे समजते.

आता ज्या भागात संसर्ग पसरत आहे, तेथे सिरो प्रिव्हलन्स कमी होता. केरळमध्ये हाच दर सुमारे 44 टक्के आहे, तर आसामध्ये हाच दर 50 टक्क्यांच्या आसपास होता. असे होण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्या भागात लसीकरण कमी झाले आणि दुसरे म्हणजे तेथे संसर्ग कमी झाला; मात्र अशा ठिकाणी तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक राहते. केरळच्या स्थितीकडे आपण सिरो प्रिव्हिलेन्सच्या द‍ृष्टीने पाहिले, तर कोरोनावाढीसाठी कमी लसीकरणाबरोबरच कोव्हिड प्रोटोकॉलची अंमलबजावणी करण्याकडे फारसे गांभीर्याने न पाहणे हेदेखील कारण असू शकते. केरळमधील लोकांनी सरकारी निर्देशांचे पालन केले. तेथे उपाय केले गेले, तरी त्याचा सध्याचा परिणाम पाहता कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. म्हणून याकडे एखाद्या राज्याचे अपयश किंवा सुविधांचा अभाव या द‍ृष्टीने पाहू नये. ही एक स्वाभाविक स्थिती आहे. आपण संक्रमण रोखण्याचा प्रयत्न करत असाल, तर लोक संसर्गाच्या संपर्कात कमी येतील आणि त्यांच्यात अँटिबॉडी तयार होणार नाहीत. त्याचवेळी आपण उपाय केले नाही, तर लोक अधिक संख्येत बाधित आणि आजारी पडतील. ज्या ठिकाणी तपासणी केली जात आहे, तेथे पॉझिटिव्हिटी रेट देखील अधिक आहे. याचाच अर्थ कोरोनाचा फैलाव सुरूच आहे.

कोरोनाबाधितांची संख्या खूपच कमी किंवा असून नसल्यासारखी असेल, तर लोकांनी आपल्या भागातील कोरोनाचे संकट टळले, या अविर्भावात राहू नये. काही भागांत संक्रमण न झाल्याने किंवा लस न घेतल्याने अँटिबॉडी तयार न झालेल्या लोकांची संख्यादेखील खूप आहे. अशावेळी आपले उपाय सुरूच ठेवावे लागतील. खबरदारी घेतल्यास किमान संसर्ग पसरण्याच्या वेगाला काही प्रमाणात आळा बसेल आणि बाधित होण्याची संख्या नियंत्रित राहील. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना डोस मिळत आहे, त्यांनी ते घेण्यात हलगर्जीपणा करू नये. तिसर्‍या लाटेची भविष्यवाणी आताच करता येणार नाही. वाढता संसर्ग कसा नियंत्रित करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या भागात कोरोनाचा वेग अधिक असेल, तेथे अधिक कडक उपाय योजना कशारितीने करता येईल, हे पाहावे लागेल. याचवेळी जगात अनेक देशांत कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचेही लक्षात घ्यावे लागेल.

Back to top button