किती लुटाल? | पुढारी

किती लुटाल?

अहो आबुराव, तिघं-चौघं मिळून एवढ्या लगबगीनं चाललात कुठे?
स्टेशनवर.
कुठं काढताय दौरा?
हे आमचे पाहुणे गावी निघालेत. आम्ही दोघं-तिघं असेच त्यांना सोडायला जातोय.
तिघं तिघं? नका जाऊ.

आपल्या माणसाचा निरोप घ्यायचाय. बरं वाटतंच ना जीवाला कोणी सोबत असेल तर?
जीवाला वाटू दे. खिशाला नाही बरं वाटणार तेवढंं!
अहो, प्लॅटफॉर्म तिकिटाचंच म्हणताय ना, जाऊ दे की एकेकाचे धा धा रुपये!
धा विसरा बरं. आता प्लॅटफॉर्म तिकीट तीस झालंय पुण्यात!
बाबो! माणसागणिक तीस तीस रुपये नुसते प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजायचे?
हो. पुणे स्टेशनावर तीस, मुंबईत तर पन्नास.
अरेच्चा! आता आता तर धा होते.
वाढवलेत रेल्वेने.

एकदम एवढे? तीन किंवा पाचपट? ते पण एवढे पटापट?
आता सुट्ट्या पडल्याहेत. घरोघरची माणसं कुटुंबकबिल्यासंगं प्रवास करणार. त्यांना सोडायला जाणारे, घ्यायला येणारे वाढणार. म्हणून रेल्वेच्या तोंडाला सुटलं असेल पाणी.
नुसतं तेवढंच नाही. कोरोना काळात लोक प्रवास करू शकत नव्हते. आता एकदम सुटलेत सारे. स्टेशनांवर तेवढी बेफानगर्दीपण धोक्याचीच ठरेल ना? तिला आळा घालावा म्हणून पण असे मार्ग काढावे लागतात.
अहो, मग स्टेशनांवर पोलीस नेमा. माणसांना आत जाण्यापासून रोखा.
पैसे वाढवले की, आपसूक रोखलं जातं. तो चाप सगळ्यात बेष्ट. नाहीतरी आपल्याकडे एकाला सोडायला दहा जणांनी जायचं खूळ जास्तच आहे.

संबंधित बातम्या

तो वेगळा पॉईंट झाला. ती आपली पाहुणचाराची कल्पना झाली; पण तेवढ्यासाठी किती लुटाल लोकांना?
अहो आबुराव, पुणे स्टेशनावर तरी फक्त 18 मे ते 31 मे एवढ्यासाठीच केलीये हो ही वाढ.
बस्का? मला सांगा, कुठलेही भाव, दर एकदा वाढले, तर पुन्हा कमी केले असं होतं का हो कधी? जास्त दीडक्या मोजायची सवय करतातच ना लोक? कोण एवढा सत्याचा वाली निघतो का जगात?
तेही खरंच म्हणा; पण काय करणार? सांगतील त्याला माना डोलवण्याशिवाय दुसरं आपल्या हातात काय आहे?
खरंय; पण एक मात्र वाटतंय. कोरोनापासून सामान्य माणूस फारफार भरडला गेलाय. वीज, पाणी, फोन, प्रवास वगैरे गरजांसाठी त्याला लुटणं आता थांबायला हवंय. कधीतरी वैतागून त्याने राज्य चालण्यालाच खीळ बसवली नाही म्हणजे मिळवली.
खरंय तुमचंबी, ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. जनता गरीब पडली म्हणून बेछूट लुटायला जाऊ नये. हा धडा सत्ताधारी घेतील तो सुदिन!
– झटका

Back to top button