उष्णतेच्या लाटेचा धडा | पुढारी

उष्णतेच्या लाटेचा धडा

एप्रिलपासूनच उष्णतेच्या लाटेने देशभरातील लोकांना भाजून काढले असताना अजून समोर अख्खा मे महिना आहे आणि पुढील काही दिवसांत तापमान वाढणार असल्याच्या इशार्‍याने काळजी आणखी वाढवली आहे. हवामान बदलामुळे सगळ्याच ऋतूंची तीव्रता आणि अनियमितता वाढली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. हिवाळ्यात थंडीची लाट निर्माण होते आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट. कुठलाच ऋतू जगण्यासाठी उत्साहवर्धक राहत नाही.

परिणामी, माणसाच्या काम करण्याच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होत असतो. या सगळ्याचे खापर हवामान बदलावर फोडून त्याला जबाबदार असलेला माणूस त्यापासून नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करीत असतो. स्थिती बिकट बनली आहेच; परंतु भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याचा गंभीरपणे विचार करून जीवनशैली बदलली नाही आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या नाहीत, तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. ‘जी-20’ देशांशी संबंधित एका हवामान अहवालानुसार कार्बन उत्सर्जन अधिक राहिल्यास भारतातील उष्णतेच्या लाटा पुढच्या चाळीस वर्षांत पंचवीसपट अधिक राहण्याची शक्यता आहे.

त्यावेळची परिस्थिती नेमकी काय असू शकेल, याचा विचार करण्याची गरज त्यातून अधोरेखित होतेच, शिवाय आपण आपल्याच भावी पिढ्यांचे गुन्हेगार म्हणून ओळख ठेवायची का, असाही प्रश्न उपस्थित होतो. यंदाच्या उष्णतेच्या लाटेसंदर्भातील जे शास्त्रीय अभ्यास समोर आले आहेत, त्यानुसार 11 मार्चपासून उष्णतेची लाट सुरू झाली होती, तिने 24 मार्चपर्यंत पंधरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भाजून काढले. महाराष्ट्रालाही या लाटेचा फटका बसला; परंतु राजस्थान आणि मध्य प्रदेश ही दोन राज्ये सर्वाधिक होरपळली. या दोन्ही राज्यांत तब्बल सव्वा महिना उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहिला. नुसतेच ऊन वाढले म्हणजे उष्णतेची लाट होत नाही.

हवामानशास्त्र विभागाने जे निकष ठरवले आहेत, त्यानुसार मैदानी प्रदेशात 40 अंश सेल्सिअस, किनारपट्टीच्या प्रदेशात 37 अंश आणि पहाडी क्षेत्रातील तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पलीकडे जाते तेव्हा उष्णतेची लाट म्हटले जाते. शिवाय एखाद्या ठिकाणच्या तापमानामध्ये नेहमीपेक्षा साडेचार ते साडेसहा अंश सेल्सिअस वाढ झाल्यावर उष्णतेच्या लाटेची घोषणा केली जाते. यावर्षी हिमाचल प्रदेशासारख्या पहाडी प्रदेशातही तीन आठवड्यांहून अधिक काळ उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवला, यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे. उष्णतेच्या लाटेचा फक्त मानवी आरोग्यावरच परिणाम होतो, असे नाही, तर शेती आणि पाण्यावरही गंभीर परिणाम होत असतात. या गोष्टी परस्परसंबंधित आणि गुंतागुंतीच्या असतात.

भारतात उष्णतेच्या लाटेमुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या अलीकडे कमी झाली असली, तरी मानवी आरोग्यावरील दुष्परिणामांची तीव्रता वाढली आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात सध्याच्या रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकावर उष्णतेच्या लाटेचे दुष्परिणाम झाले असून वीस ते साठ टक्क्यांपर्यंत नुकसान होणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

हवामान बदलाचा जप करून त्यात बदल होणार नाही किंवा स्वतःला वैश्विक समस्येची जोडून घेऊन व्यक्तिगत जबाबदारी झटकता येणार नाही. महानगरांमध्ये घरांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गेल्या तीन-चार दशकांमध्ये गगनचुंबी इमारतींच्या बांधकामांना वेग आला. आकाशाला भिडणार्‍या आणि बाहेरून विलोभनीय दिसणार्‍या या इमारती आता उष्णतेची बेटे बनल्या असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या ठिकाणांचे तापमान सामान्य स्थितीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअस जास्त असल्याचे मोजले गेले आहे. आयआयटी दिल्लीच्या प्रा. मंजू मोहन यांनी केलेल्या अभ्यासानुसार, गेल्या काही वर्षांपासून ही उष्ण बेटे आता उष्णतेच्या लाटा निर्माण करणारी केंद्रे बनली आहेत.

शहरी क्षेत्राचा आकार वाढल्याने तापमानाची वाढ केवळ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच नसते, तर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ती वाढत जाते. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलासंदर्भातील एका अहवालानुसार जगभरातील तापमानवाढीपैकी 75 टक्के वाढीसाठी आणि अतिवृष्टीच्या 18 टक्के वाढीसाठी मानवनिर्मित गोष्टी जबाबदार आहेत. त्यामुळे हवामान बदल आणि त्यांच्या दुष्परिणामांची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हे प्रयत्न सामान्य पातळीवर कोणत्या स्वरूपाचे असतील, याबाबतही सातत्याने प्रबोधन करीत राहिले पाहिजे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उष्णतेच्या लाटेचे दुष्परिणाम रोखण्यासाठी तत्कालिक उपायांबरोबरच दीर्घकालीन उपाययोजनाही आवश्यक आहेत. शहरातील तापमानवाढ रोखण्यासाठी निश्चित उपाययोजना करायला हव्यात. प्रचलित बांधकाम साहित्यासंदर्भात शास्त्रीय संशोधन करून त्यासंदर्भात आवश्यक ते बदल करण्याची गरज व्यक्त होत आहे. पारंपरिक बांधकाम साहित्याचा उष्णता साठवण गुणधर्म कमी करण्यासाठी बांबू आणि चिकणमातीसारख्या पर्यायी बांधकाम साहित्याचा वापर केला पाहिजे.

शक्य तेथे शहरात लहान, हिरवीगार, मोकळी जागा किंवा पाण्याचे छोटे स्रोत असावेत. कारण, ते उष्णता शोषून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असेही या संदर्भातील अभ्यासातून सुचवण्यात आले आहे. जसजसे शहर वाढत जाते, तसतशी शहराची उष्णता वाढत जाते. त्यामुळे आसपासच्या ग्रामीण किंवा कमी विकसित भागांपेक्षा शहर अधिक उष्ण असते. हवामानशास्त्रानुसार, अनेक वातावरणीय प्रक्रिया जमिनीच्या पृष्ठभागाच्या स्थितीवर अवलंबून असतात.

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि पायाभूत सुविधांच्या दबावामुळे जमिनीचा वापर आणि जमिनीच्या आच्छादनातील बदल शहरी भागात होत आहेत. शहरातील मोकळ्या जागा कमी होत आहेत. वेगाने होणार्‍या सिमेंटीकरणामुळे उष्णता वाढतेच, शिवाय पावसाळ्यात पाणी जमिनीत मुरत नसल्यामुळे पूरपरिस्थितीलाही निमंत्रण दिले जाते. या बाबींचा गंभीर विचार केल्यानंतर वाढते शहरीकरण, माणसांची बदलती जीवनशैली यांचा हवामानावर विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात येईल. त्यामुळे केवळ हवामान बदलावर चर्चासत्रे झाडण्याऐवजी स्थानिक पातळीपासूनच पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन दिले, तर भविष्यातील संकटाची तीव्रता कमी करता येऊ शकेल.

Back to top button