भगवान महावीरांची अष्ट आचारसूत्री | पुढारी

भगवान महावीरांची अष्ट आचारसूत्री

भगवान महावीरांनी आचाराची अष्टसूत्रे या स्वरूपात दिलेले विचार सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकाने जर आपल्या आचरणात ही सूत्रे शक्य तेवढ्या प्रमाणात अंमलात आणल्यास विश्वशांती प्रस्थापित होऊ शकेल. आज महावीर जयंती, त्यानिमित्त…

भगवान महावीर यांनी आपले जीवन कल्याणप्रद होण्यासाठी सांगितलेली सूत्रे ही आचरणाची किंवा जीवन जगण्याची जीवनसूत्रे आहेत. यातील 5 जीवनसूत्रे ही सकारात्मक, तर 3 जीवनसूत्रे ज्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे, अशा नकारात्मक बाबीशी निगडीत आहेत.ईर्या, भाषा, एषणा, आदान व उत्सर्ग हे पाच सक्रिय तत्त्वे तन मनोगुप्ती, वचनगुप्ती व कायागुप्ती ही 3 अशी आठ नियम चौकट दिली आहे.

भगवान महावीरांनी ईर्या तत्त्व जाणीव जागृतेशी जोडले असून कोणतीही कृती अज्ञानातून, सवयीचा भाग म्हणून न करता स्वजाणीव जागृत ठेवून करण्याचे आहे. बोधावस्था न ठेवता केलेले पुण्य अथवा दान हे व्यर्थ असते. कोणतीही कृती आत्म्यास किंवा स्वजाणीवेस साक्षी ठेवून केल्यानेच आपण योग्य वाटचाल करू शकतो. जाणीवपूर्वक कृती नसेल, तर आपण एखाद्या नशेत जीवन जगतो. खरे तर प्रत्येकजण आत्मभान किंवा ईर्या विसरून कोणत्याही एका नशेच्या आहारी जगत असतो. एखादा धनाच्या नशेत धनसंचय यालाच जीवन समजतो, तर दुसरा सत्ता हेच सगळे समजून सत्तेच्या नशेत राहतो, तर एखाद्यास सौंदर्याची नशा असते. प्रसिद्धीचा हव्यास हे पण नशेचाच प्रकार असून त्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यास ती व्यक्ती तयार असते. यातील नशा कमी झाली की ती व्यक्ती जीवनकार्य समजू लागते. नशेतून जागे होऊन आपले मूळ स्वरूप जाणून व्यवहार केल्यास पाप घडूच शकत नाही. हे सर्व कशासाठी, या प्रश्नाचे उत्तर न शोधल्याने सर्व जीवन धावपळ, स्पर्धा, संचय यात संपून जाते. जाणीवपूर्वक कृती करण्याचे सूत्र सर्व इतर सूत्रांपेक्षा मोठे असून ते केवळ एक जरी पूर्णतः अंमलात आणले, तरी आपण महावीरांच्या महामार्गाचे पांथस्थ होऊ शकतो.

भाषा किंवा शब्दवापर, संभाषण हे दुसरे महत्त्वाचे आचरण सूत्र असून अनेकवेळा भाषेचा योग्य वापर न केल्याने आपण आपले व इतरांचे नुकसान करतो. मृदू भाषा, सत्य वक्तव्य, योग्यवेळी केलेले वक्तव्य हेच आचरणसूत्र असले पाहिजे. भाषेतून आपण इतरांशी तर मौनातून स्वतःशी संवाद साधत असतो. इतरांशी संवाद साधताना बोलणे आवश्यक आहे का? ज्याच्याशी बोलणार ती ऐकण्यास तयार आहे का? जे बोलणार ते सत्य आहे का व हितकारक आहे का, हे प्रश्न प्रथम आपणास विचारून भाषा वापरावी. केवळ बोलण्यासाठी बोलणे, इतरांना त्रास होईल, नुकसान होईल असे टाळणे हे आचरण आपणास भाषा वापराचे निकष पूर्ण केले व जिनसूत्र वापरले असे समाधान देते. ‘मीठा बोलो, कम बोलो, धीरे बोलो’ हे वचन भाषा आचारसूत्राचाच छोटा भाग आहे.

आचारसूत्रातील तिसरे सूत्र ऐषणा किंवा भोगाची अपेक्षा आहे. शरीरास आवश्यक अन्न, वस्त्र व इतर बाबी आवश्यक तेवढ्या प्रमाणातच देणे हे आदर्श सूत्र आहे. याचाच अर्थ आपणास एक वेळ भोजन पुरेसे असेल, तर दोन वेळा न घेणे. चार तास झोप पूरक असेल, तर त्यापेक्षा अधिक न घेणे, यातून भोग हे जीवनास आवश्यक तेवढे घेणे हे योग्य. तथापि, भोगासाठीच जगणे, अती भोगातून तृप्ती नाही, तर अतृप्ती आणि आजार यांना आमंत्रण असते. भूकबळीपेक्षा अतिप्रमाणात खाऊन आजारी पडणारे, मरणारे अधिक आहेत, हे वास्तव आहे.
आदान किंवा स्वीकृतीबाबतचे चौथे सूत्र हे आवश्यक व उचित असेल तेवढेच स्वीकारण्याबाबतचे आहे. केवळ प्राप्त होते म्हणून स्वीकारणे हे हव्यासालाच जन्म देते. पशू, पक्षी ज्याप्रमाणे हवे तेवढेच घेतात, संग्रह करीत नाहीत, तसेच आपणही गरजेपुरते स्वीकारून उर्वरित नाकारले पहिजे. असे केल्याने वस्तू, सेवा ज्यांना गरज आहे त्यांना उपलब्ध होईल. वैचारिक आदान स्वीकृतीसही हे लागू पडते.
आपण जेवढे घेतो त्याचे उत्सर्जन करीत असल्याने पाचवे सूत्र हे उत्सर्जनाबाबत पाळावयाची शूचिता यासंबंधी आहे. आपल्या मल, मूत्राचेच नव्हे, तर घेतलेल्या श्वासाचे उत्सर्जन करीत असताना कोणासही त्याचा त्रास होऊ नये, अशी काळजी घेतली पाहिजे. जैन मुनी मुखावर मुखपट्टी वापरतात याचे कारण श्वासोच्छवासातूनही सूक्ष्म जीवांची हानी होत असते. नेहमीच्या व्यावहारिक पातळीवरही आपणास प्राप्त झालेली माहिती, बातमी तत्काळ कोणास तरी सांगण्याची तीव्र इच्छा होते. तेथेही उत्सर्जनाचे आचारसूत्र पाळले पाहिजे. अनेक विवाद, गैरसमज संघर्ष याचे सूत्र अपुरी, चुकीची, पडताळून न पाहिलेली माहिती दुसर्‍यास दिल्याने होत असते. सामाजिक शांतता व सलोखा याचा संबंध उत्सर्जन आचारसूत्रात आहे.

मनोगुप्ती, वचनगुप्ती आणि काया गुप्ती हे तीन निग्रहाचे आचार धर्म असून या न करण्याच्या कृतीशी संबंधित असल्याने त्यांना वेगळ्या गटात समाविष्ट केले आहे. मनोगुप्ती ही मनावर, विचारावर नियंत्रण ठेवणे यासंबंधित आहे. मनाचा निग्रह हा अनेक सकारात्मक बाबीचा पाया व नकारात्मक बाबीचा प्रारंभ ठरतो. मनोनिग्रह हा सहावा आचारधर्म ठरतो.

वचनगुप्ती यामध्ये वचन किंवा शब्द यांचा निग्रह नियंत्रण समाविष्ट आहे. शब्दांचा वापर दोन व्यक्तींमध्ये संबंध प्रस्थापित करतो. ऐकणार्‍याने तो नीट स्वीकारला नाही, तर सांगणार्‍याने चांगले सांगितले, तरी गैरसमज होण्याची शक्यता असते. अकारण संभाषण करणे, अपुर्‍या माहितीच्या आधारे होणारे बोलणे न करणे हा वचनगुप्तीचा अर्थ आहे. अहितकारक, अवेळी, कटुवचने जर निग्रहपूर्वक आपण टाळली, तर आपले व इतरांचे निश्चितच नुकसान टाळले जाते.

वचनगुप्तीची आवश्यकता सध्याच्या माहितीतंत्राच्या आधारे होत असलेल्या संवादास अधिक लागू पडते, हे सातवे आचारसूत्र आता प्रकर्षाने सर्वांनी स्वीकारणे गरजेचे आहे.
कायागुप्ती हे आठवे आचारसूत्र आपले शरीर निग्रहपूर्वक नियंत्रणात ठेवण्याचे आहे. शरीर हे साधन असून त्याचा वापर संयतपणे करीत जीवन जगणे यामध्ये अभिप्रेत आहे. शरीराचे अनावश्यक पोषण न करता त्याची आरोग्यपूर्ण देखभाल कायागुप्तीचा भाग ठरतो. आत्मभान जागे ठेवून भाषेचा समूचित वापर करीत, भोगास मर्यादा घालून आपले घेणे व देणे संतुलित करीत मनोगुप्ती, वचनगुप्ती व कायागुप्ती साधली, तरी महावीरांची जीवनचर्या आपणही साध्य करू शकतो.

– प्रा. विजय ककडे

Back to top button