भरकटलेल्या क्षेपणास्त्राचे गूढ! पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा का गाफील राहिली? | पुढारी

भरकटलेल्या क्षेपणास्त्राचे गूढ! पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा का गाफील राहिली?

काही दिवसांपूर्वी भारताचे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानवर डागले गेल्याची घटना घडली. दोन्ही अण्वस्त्रधारी देशांदरम्यान झालेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. अर्थात, या क्षेपणास्त्राच्या आघाताने पाकिस्तानचे फारसे नुकसान झाले नाही. तांत्रिक बिघाडामुळे अपघाताने क्षेपणास्त्र डागले गेल्याचे भारताने स्पष्ट केले असले तरी या घटनेमधून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. एकीकडे यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेतील उणिवा समोर आल्या आहेत, तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानची सुरक्षायंत्रणा किती सक्षम आणि सतर्क आहे याची चाचपणी करण्यासाठी हे चाचणी क्षेपणास्त्र डागण्यात आले का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तणाव पसरलेला असताना चीनने पाकिस्तानला नुकतीच नवी लढाऊ विमाने दिल्याचे वृत्त समोर आले. याचदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आसन अविश्वास प्रस्तावामुळे डळमळीत झाल्याची चर्चा सुरू झाली. हे घडत असतानाच भारतात पाच राज्यांच्या निवडणूक निकालांची धामधुमी सुरू होती. अशा सर्व प्रसंगांमध्ये एक विचित्र आणि धोकादायक वाटावी अशी घटना घडली. विशेष म्हणजे पाकिस्तान वगळता जगभरात इतर कुठेही त्याची फारशी मोठी प्रतिक्रिया उमटली नाही. काय होती ही घटना? 9 मार्च रोजी भारताचे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानवर डागले गेले. विशेष म्हणजे या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांदरम्यान झालेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. अर्थात, या क्षेपणास्त्राच्या आघाताने पाकिस्तानचे फारसे नुकसान झाले नाही.

पाकिस्तानकडून त्याच दिवशी संध्याकाळी ‘भारताकडून आपल्या भूमीवर क्षेपणास्त्र डागले गेले पण जीवित वा वित्तहानी झाली नाही,’ असे जाहीर करण्यात आले. भारताने त्यानंतर दोन दिवसांनी स्पष्टीकरण दिले आणि आपल्याकडून तांत्रिक बिघाडामुळे अपघाताने क्षेपणास्त्र डागले गेले, असे सांगतानाच उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करू, असे जाहीर केले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, आम्ही प्रत्युत्तर देऊ शकलो असतो; पण संयम राखला. आम्हाला आमचे लष्कर आणखीन बळकट करावे लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

हे क्षेपणास्त्र हरियाणाच्या शिरसा येथून राजस्थानमधील महाजन फिल्ड फायरिंग रेंजच्या दिशेने डागले गेले; पण क्षेपणास्त्राने हवेत अचानक दिशा बदलून पाकिस्तानात प्रवेश केला आणि 3 मिनिटे 44 सेकंद प्रवास करून 124 किलोमीटर अंतरावरील मिया चानू (पंजाब) येथे एका घरावर आदळले. सुदैवाने, यामध्ये जीवितहानी झाली नाही. या क्षेपणास्त्राच्या संपूर्ण प्रवासावर आमचे लक्ष होते, असे पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफतिकार यांनी सांगितले.

या घटनेबद्दल जी चर्चा सुरू आहे, त्यामधून अशी माहिती मिळते की, सराव चाचणीवेळी हे क्षेपणास्त्र पाकिस्तानवर डागले गेले. हे क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे; पण भारताने ते कोणत्या प्रकारचे आहे हे उघड केलेले नाही. क्षेपणास्त्रावर वॉरहेड्स (अस्त्रे अथवा दारूगोळा) बसवलेली नव्हती. ब्रह्मोस ही रशिया आणि भारत यांची संयुक्त निर्मिती आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र 400 कि.मी. पेक्षा जास्त पल्ला गाठते. ते अतिशय अचूक आणि भेदक आहे, ध्वनीपेक्षा जास्त वेगाने ते जात असल्यामुळे ते सुपरसॉनिक क्रूझ प्रकारात मोडते. ब्रह्मोसमध्ये पारंपरिक आणि अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. हवा, जमीन आणि समुद्र अशा तिन्ही ठिकाणांवरून ते डागता येते. भारताकडे अशी 15,000 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे असावीत, असा दावा चिनी ‘थिंक टँक’ने केलेला आहे.

या घटनेमधून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. भारताने कबुली दिल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी संवेदनशील तंत्रज्ञान हाताळण्याविषयीच्या भारताच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली.

शिष्टाचारानुसार भारताने अपघाताने क्षेपणास्त्र डागले गेल्यानंतर आम्हाला त्वरित माहिती का दिली नाही? आणि कबुली देण्यास दोन दिवस विलंब का लावला? या क्षेपणास्त्रामध्ये स्वविध्वंसक यंत्रणा होती का? असली तर मग ती का अपयशी ठरली? नियमित देखभालीच्या वेळी क्षेपणास्त्रे उड्डाणाच्या पवित्र्यात ठेवली जातात का? खरोखरच हे क्षेपणास्त्र भारतीय सशस्त्र दलाकडून हाताळले गेले की काही असंतुष्ट घटकांचा यामागे हात आहे ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. याउलट पाकिस्तानी संरक्षण यंत्रणेच्या क्षमतेवरही शंका उपस्थित केली जात आहे. जिल्हा मियानी, सरगोधा येथील पाकिस्तानी एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स अतिशय आधुनिक असून, क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या हालचाली टिपण्यात सक्षम आहे. असे असताना भारतीय क्षेपणास्त्र आपल्या हद्दीत 124 कि.मी. प्रवास करून जमिनीवर आदळेपर्यंत पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा का स्वस्थ बसली? की या यंत्रणेला काहीच कल्पना आली नाही? की ती गाफील राहिली?

खरोखरच पाकिस्तानी यंत्रणेचे या भारतीय क्षेपणास्त्राच्या प्रवासावर लक्ष होते, तर त्यांनी हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट का केले नाही? की त्यांच्याकडे ती क्षमता नाही? कारण क्षेपणास्त्र ज्या मार्गाने गेले, तेथे विमानांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. हे क्षेपणास्त्र साधारण: 40 हजार फूट उंचीवरून गेले आणि विमाने साधारणत: 35 हजार ते 42 हजार फूट उंचीवरून उडत असतात. त्यामुळे या क्षेपणास्त्राने विमान प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकला असता, ही कल्पना असताना पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा का गाफील राहिली?

पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते बाबर इफतिकार यांनी सांगितले की, दोन्ही देशांत (भारत-पाकिस्तान) बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचण्यांच्या माहितीची देवाण-घेवाण करणारा करार झालेला आहे; पण पाकिस्तानवर डागल्या गेलेल्या सुपरसॉनिक प्रकारच्या क्षेपणास्त्राविषयी आमच्यात माहितीची देवाण-घेवाण होत नाही. डागल्या गेलेल्या क्षेपणास्त्राच्या प्रवासाविषयी पाकिस्तानी लष्करी प्रवक्त्याने दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा आता केला जात आहे. हरियाणातील शिरसा येथून हे क्षेपणास्त्र डागले गेले नाही. शिरसा येथे ब्रह्मोस तळ नाही. विशेष प्रकारच्या खास ट्रकमधून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यंत्रणा कार्यान्वित करता येते.

– प्रसाद वि. प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

Back to top button