न्यूटनचा चौथा नियम व गुंतवणूक | पुढारी

न्यूटनचा चौथा नियम व गुंतवणूक

गुंतवणुकीच्या क्षेत्रात वॉरेन बफे अनेकांचे आदर्श असून त्यांनी दिलेले सल्ले, सूचना त्यांच्या वार्षिक पत्रातून स्पष्ट होतात. वर्षातून एकदाच ते भागधारकांशी संवाद साधतात. त्यांनी गुंतवणुकीबाबत केलेले भाष्य नंतर सिद्धांत झाले. सध्या रशिया-युक्रेन युद्धातून जगभर भांडवल बाजार नवनवीन नीचांक दर्शवत असून अद्याप भयनाट्य संपलेले नाही. अणुयुद्ध, तिसरे महायुद्ध अशा चढत्या क्रमाने संघर्ष विकोपास जाईल का पुनःश्च शांतता येईल, याबाबत अनिश्चितता असली, तरी अशा भयप्रद अवस्थेत गुंतवणूक धोरण कसे असावे, याबाबत अशाच संकटानंतर भांडवल बाजार कसा प्रतिसाद देत होता, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

जागतिक स्तरावर सातत्याने युद्धे, मंदी, आर्थिक घोटाळे, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारख्या महाआपत्ती येत असतात व दर 5 ते 10 वर्षांच्या टप्प्यात याचा परिणाम भांडवल बाजार कोसळण्यात होतो. याबाबत पुढील तालिकेतील माहिती उपयुक्त ठरेल.

जागतिक स्तरावर आर्थिक भूकंपाचे धक्के ‘डाऊ जोन्स’ या अमेरिकन शेअर बाजाराच्या दर्शकाने कशा प्रकारे प्रतिसाद दिला हे वरील तालिकेतून स्पष्ट होते. आर्थिक भूकंपाने होणारी पडझड सर्वांत अधिक 2020 मध्ये अनुभवली असून बाजारात 35 टक्के घसरण झाली. परंतु, नंतर एक वर्षात 78 टक्क्यांनी वाढला. आर्थिक भूकंपानंतर 1 वर्षाच्या कालावधीत बाजार केवळ सावरतो, असे नाही, तर अधिक चांगला परतावा देतो.

न्यूटनचा चौथा नियम

न्यूटनचे गतीविषयक 3 नियम जगप्रसिद्ध असून त्याचे योगदान शास्त्रीय प्रगतीस फार मोठे आहे. गुंतवणुकीच्या क्षेत्रात न्यूटनलाही मोठे नुकसान पत्करावे लागले. त्याने ‘साऊथसी’ कंपनीत गुंतवणूक केली व थोडा नफा मिळवल्यावर ते शेअर्स विकले. परंतु, पुन्हा त्या शेअर्सचे दर वाढतात हे पाहून मोठी गुंतवणूक केली; परंतु त्याला 20 हजार डॉलरचे (1793) नुकसान झाले. या अनुभवाच्या आधारे वॉरेन बफे यांनी गतीविषयक नियम गुंतवणूक क्षेत्रासाठी बनवला तो न्यूटनचा चौथा नियम असे ते म्हणत. तो नियम सोपा असला, तरी अंमलात आणणे अवघड आहे. परंतु, सध्या अधिक परताव्यासाठी गुंतवणूक बदलाची गती वाढवणे हेच महत्त्वाचे मानणारे जे आहेत त्यांना महत्त्वाचे आहे. तो नियम असे सांगतो की, ‘गती वाढल्यास परतावा घटतो’  परतावा वाढवण्यासाठी सक्रिय गुंतवणूक धोरण (अलींर्ळींश खर्पींशीीांशपीं झेश्रळलू) ही जरी अल्पकाळात परतावा वाढवू शकली, तरी दीर्घकाळात हे धोरण फायद्याचे ठरत नाही.

गुंतवणूक सल्लागार, विशेषज्ञ गुंतवणूक संस्था व त्यातील विश्लेषक तज्ज्ञ ही मंडळी गुंतवणूकदारांना सातत्याने गुंतवणूक फेरफार करण्याचा सल्ला देतात आणि त्यासाठी मोठी फी किंवा कमिशन घेतात. अधिक परताव्याच्या आकर्षणास बरेच गुंतवणूकदार बळी पडतात. परतावा वाढला नाही, तर बाजारपेठेतील अनपेक्षित बदल, आंतरराष्ट्रीय घटक, नैसर्गिक आपत्ती अशी कारणे देऊन पुन्हा नव्या क्षेत्राच्या परताव्याचे उच्च आश्वासन नवा हुच्चपणा ठरतो व या सर्व खेळात गुंतवणूकदाराचे परतावे 20 टक्क्यांपर्यंत या मध्यस्थ सल्लागारांना फी रूपाने द्यावे लागतात. निष्क्रिय गुंतवणूक धोरण यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सविस्तर अभ्यास करून दीर्घकालीन गुंतवणूक केली जाते. मोठ्या गतिमान परताव्याऐवजी स्थिर व आवश्यक परतावा घेण्यास प्राधान्य असल्याने गुंतवणूक प्रकल्प फायदेशीर होऊन सातत्याने आधिक्य निर्माण करतात.

यात जोखीम कमी राहते आणि परतावा योग्य मिळतो. परताव्याच्या हव्यासातून होणारे नुकसान टाळले जाते व अंतिमतः गतिमान किंवा आक्रमक धोरणातून मिळणार्‍या परताव्यापेक्षा अधिक परतावा निष्क्रिय गुंतवणूक देणारी ठरते. कासवाची आणि सशाची शर्यंत ही रूपककथा गुंतवणूक धोरणातही चपखलपणे लागू होते.

संथ परंतु स्थिर गतीने वाटचाल, कमी धक्के देणारी पर्यायाने मानसिक स्वास्थकारक ठरते. विशेषतः सातत्याने बाजारातील चढ-उताराने चिंताग्रस्त होण्यापेक्षा स्थैर्यपूर्ण गुंतवणूक हाच सुवर्णमार्ग ठरतो. वॉरेन बफे यांच्यासारखे श्रीमंत होण्याचे स्वप्न प्रत्येक गुंतवणूकदाराचे असते. परंतु, त्यांची दीर्घकाळ गुंतवणूक असणारी सहनशीलता नसल्याने झटपट श्रीमंत होण्याच्या फंदात पटपट कंगाल होतो. न्यूटनचा गतीविषयक चौथा नियम यासाठी सद्यस्थितीत महत्त्वाचा ठरतो.

घटना वर्ष घसरण 1 वर्षानंतर बदल
कोरियन युद्ध 1950 12% 26%
अरब तेल संकट 1973 18% 25%
आखाती युद्ध 1991 4.3% 24.3%
1987 चे बाजार संकट 1987 34.2% 24%
लेमन ब्रदर्स संकट 2008 33% 40%
कोव्हिड 2020 35% 78%

– प्रा. डॉ. विजय ककडे

Back to top button