मुद्दा नाही नवासा | पुढारी

मुद्दा नाही नवासा

फॅमिलीबरोबर थंड हवेच्या ठिकाणाची सहल करून आलात म्हणे? लांबचा प्रवास का?
नाही हो. तब्बल दोन वर्षांत कुठे थंड हवेच्या ठिकाणी जाणं-येणं झालं नव्हतं. म्हटलं जरा जवळपास तरी जाऊन यावं.
कशी झाली ट्रीप?
आईस्क्रीम छान मिळालं.
ट्रीप कशी झाली? गाव कसं वाटलं?
हॉटेल पॉश होतं.

गावाबद्दल बोला की काहीतरी राव! नुसतं आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक काय आठवताय?
गाव ना? मस्तच की! छान रस्ते, भव्य बागा, हॉटेलं, चैन आहे सगळी. तीही इतकी आपल्याजवळचं.
ऐकलंय बरंच. कृत्रिमरीत्या बनवलेलं थंड हवेचं ठिकाण म्हणून खास असणारच ते. पूर्वी ब्रिटिश म्हणजे गोरे साहेब बनवायचे म्हणे अशी आर्टिफिशिअल हिल स्टेशन्स! तसं देशी साहेबांनी बनवलेलं हे पहिलंच ना?

हो, बहुतेक. आता त्यांनी बनवायचं ठरवलंच, तर काय, आपल्याकडे काहीही आणि कोणालाही बनवता येतं. तसं हे एक.
आमच्या एका स्नेह्यांची थोडी जमीन होती तिथे. बक्कळ पैसा मिळाला तिचा असं ऐकलं.
असेल बुवा. आतापर्यंत ती जमीन पाच-दहा लोकांच्या नावे झाली असेल. त्यांच्याकडून गेली असेल. हस्तांतरणांचा उच्चांक झालाय म्हणतात तिथे.

तसे इतरही खूप उच्चांक गाठले असणार तिथे. ‘उंचे लोग, उंची पसंद’ म्हणतातच ना? त्यात ही जागाही उंचावरचीच. एकेका छोट्या दाखल्यासाठी, लायसनसाठी, परवानगीसाठी उंच उंच बोली लागलीच असणार हो. आपण समजून घ्यायला हवं.
जिथे उच्च न्यायालयानेसुद्धा समजून घ्यायची भाषा केलीये तिथे तुम्ही-आम्ही ‘किस खेतकी मूली?’
उच्च न्यायालयाचं काय आलं मध्येच?

ते थंड हवेचं ठिकाण मध्येमध्ये गरमागरम चर्चांना चावी देतं ना, त्यावरून समजतं. मध्येमध्ये त्या थंड हवेच्या ठिकाणातली एकेक अनियमितता पटावर येत असते. कोणी कोणी याचिका वगैरे दाखल करत असतं. असं गेली आठ-दहा वर्षं चाललंय.
पुढे काय होतं?

पुढे काहीच विशेष होत नाही. तेवढ्यापुरत्या पेपरवाल्यांना बातम्या मिळतात. वकिलांना काम मिळतं. चार लोकांचा टाईमपास होतो. पुढे सगळं मागील अंकावरून पुढे चालू!
असं कसं? एवढीच काही लटपट असेल, एखाद्याच कुटुंबाचं भलं केलं असेल, तर कोणी ना कोणी आवाज उठवणारच ना! एवढे पक्ष आहेत चौफेर माजलेले, सगळे बरे गप्प बसतील?

जुने झाले असतील त्या ठिकाणचे अन्याय.
भले! नवाब मलिकांसाठी एक जुनं पानं प्रकरण घेतलंच ना हाताशी? ठरवलं तर कुठूनही काहीही उकरता येतं की आपल्याला. हं, आता गप्प बसायचंच धोरण ठेवलं, तर साक्षात उच्च न्यायालयाने या खेपेला फक्त खेदच व्यक्त केलाय हो! राष्ट्रीय संपत्तीची लूट होतेय, निसर्गाची आबाळ होतेय, छोटे शेतकरी भूमिहीन होताहेत याबद्दलची चुटपूटच आहे फक्त. जिथे उच्च न्यायालयही हतबल होतं, तिथे आपल्यासारखे कुठून पॉवर दाखवणार?

थोडक्यात काय, कोणताच मुद्दा नाही नवासा, म्हणून आपण म्हणत राहायचं, ‘आईस्क्रीमचा स्वाद होता हवाहवासा!’

– झटका

Back to top button