विज्ञानाच्या नावानं… | पुढारी

विज्ञानाच्या नावानं...

अगं, ठोकठोक कशावर करत्येस?
जळ्ळी त्या कुकरची शिट्टी वाजत नाहीये. म्हणून झाकणावर चिमट्याने ठोकून बघत्ये हो.
चापट मारल्यावर पोरं रडतात, तसा ठोसा मारल्यावर कुकरची शिट्टी वाजेल का ग? काही विज्ञान वगैरे असेल की नाही त्याच्या मागे?
हे बघा, मला कुकर नीट व्हायला पाहिजे. डाळ-भात तयार पाहिजे. बाकी विज्ञानबिज्ञान मी जाणत नाही.
तोच तर प्रॉब्लेम आहे ना. विज्ञानाबद्दल फार घोर अज्ञान आहे तुझं. परवा राष्ट्रीय विज्ञान दिनाचे प्रमुख पाहुणे हेच बोलले आमच्या संस्थेत.
आधीच कुकर धड चालत नाहीये. त्यात पाहुण्यांचं लचांड नका बाई मागे लावू.

माझे आई, 28 फेब्रुवारी हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ असतो आपल्याकडे. पूर्वी त्यादिवशी ‘रमण इफेक्ट’चा शोध लावला ना आपल्या डॉ. सी. व्ही. रामननी! थेट नोबेल पुरस्कारच मिळाला त्यांना त्याबद्दल. त्या राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या समारंभाच्या पाहुण्यांचं बोलत होतो मी.
ते होय? मग ठीक आहे. बाकी मला काय आता विज्ञान शिकून इंजिनिअरची परीक्षा का द्यायचीये?
असं नसतं बये. विज्ञान रोजच्या आयुष्यातही असतं. तू मोबाईल वापरतेस, दिवे, पंखे लावतेस, मिक्सर चालवतेस, या सगळ्यामागे विज्ञानच असतं ना!मग? मला येतात की, या सगळ्या गोष्टी. हवा तेव्हा उजेड पाडते, हवं तेव्हा मिक्सरवर चटण्या वाटते. बाकी जादा विज्ञानबिज्ञान माझ्या मागे लावू नका.

उद्या म्हणशील, मी बरोब्बर बटण दाबून लिफ्टसुद्धा गुरूगुरू खाली-वर करते. किती ग बै मी हुशार, किती ग बै मी हुशार!
मग? आहेच मी हुशार. तेवढी नवरा निवडताना जराशी माती खाल्ली मी.
काय म्हणालीस? मला नाही ऐकू आलं. मी मात्र सांगत होतो की, याच्यापुढे सर्वांनीच वैज्ञानिक द़ृष्टिकोन बाळगायला हवा. कालचे पाहुणे तेच सांगत होते.

टाळ्या वाजवल्यात ना त्यांच्यासमोर? मग बस झालं.
अरे अरे! केवढी घोर उदासीनता बरं ही ज्ञानाबद्दलची! अशाने तुम्ही बायका पुढे कशा जाणार? गॅस सिलिंडरमधला गॅस संपत आला की, सिलिंडर हलवून बघणार, वरच्या मजल्यावर ‘वीज चढेल ना नक्की?’ असं विचारणार. ही तुमची विज्ञाननिष्ठा.
ते पुरे हौ. ते आपलं व्यंगचित्रात दाखवायला ठीक आहे. बायकांची चेष्टा करायला कोणाचं काय जातंय? एकूणच आपल्याकडे बायकांचा अडाणीपणा हा फार लोकप्रिय विषय आहे; पण खरं म्हणाल, तर गणितासारखीच विज्ञानाचीही जास्त करून भीतीच असते बहुतेकांच्या मनात. आपली मुलं नाही का, विज्ञानाच्या विषयांसाठी नेहमी क्लास, ट्यूशन वगैरे हवी म्हणतात. बाकी विषयांचा अभ्यास आपला आपण करतात.

त्या क्लासच्या भरमसाट फिया आपणच तर भरतो की!
म्हणूनच म्हणावसं वाटतंय, विज्ञानाचा पुरस्कार करायचा, तर आधी लोकांच्या मनातली त्याबद्दलची भीती कमी करा. ते सोपं आहे, आपला भरवशाचा मदतनीस आहे हा विचार पसरवा. पुढच्या वर्षीच्या विज्ञान दिनापर्यंत असं काहीतरी करता आलं तर खरं!

– झटका 

Back to top button