पैशांची उधळपट्टी होताना डोळ्यांवर पट्टी होती काय ? | पुढारी

पैशांची उधळपट्टी होताना डोळ्यांवर पट्टी होती काय ?

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

वर्षभरात 278 कोटी रुपयांची खरेदी, वासाचे म्हणून बाजूला निघणारे दोन लाख लिटर दूध, नऊ हजार रुपये दर असताना 12 हजार रुपये टन अशी मोलॅसिस खरेदी, ठेकेदार पद्धतीने 800 कामगार, मोठ्या प्रमाणात पॉली फिल्मची खरेदी, वारणा दूध संघापेक्षा टँकरला फेरीमागे चार हजार रुपयांची जादा पैशांची उधळपट्टी सुरू असताना अधिकार्‍यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली होती काय? असा संतप्त सवाल करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या कारभाराचा सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत पंचनामा केला.

दोन्ही मंत्र्यांनी गोकुळच्या कारभाराची तब्बल दोन तास झाडाझडती घेतली. गोकुळच्या वारेमाप खर्चावरून कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना दोन्ही मंत्र्यांनी अक्षरश: धारेवर धरले. यापुढे असा कारभार चालणार नाही, कारभारात सुधारणा केली नाही, तर घरचा रस्ता धरावा लागेल,नूतन संचालक मंडळ आल्यापासून अनावश्यक खरेदी कशी बंद झाली? असे खडे बोल बैठकीत सुनावले. 

निवडणुकीपूर्वी काही महिने अगोदर 114 कामगारांची गरज नसताना भरती का केली? अनेक कामगारांना मुंबईत कामासाठी जावे लागेल. मुळातच जादा कामगार असताना तब्बल 800 कामगार पुन्हा ठेकेदाराकडून का? गोकुळमध्ये मागील सत्ताधार्‍यांनी अनावश्यक खर्चाचा कळस गाठला.

20 वर्षांत भाड्यापोटी अतिरिक्त पैसे देऊन गोकुळला लुबाडले, ते आता भरून काढा. यापुढे हे सर्व बंद करा. विश्वस्त म्हणूनच आपल्याला सर्वांना काम करावे लागेल, अशा शब्दांत दोन्ही मंत्र्यांनी गोकुळच्या अधिकार्‍यांना सुनावले.

बैठकीतील निर्णय

  •   451 दूध संकलन मार्गांचे पुनर्विलोकन
  •   जिल्ह्याबाहेर पाच ठिकाणचे क्लस्टर करून दूध संकलन वाढवणे
  •   टँकरच्या दरात कपात
  •   मोलॅसिस खरेदीची फेरनिविदा
  •   ताक आणि लस्सीची टेट्रापॅकमधून विक्री
  •   टँकरचे फ्री पास बंद
  •   पारदर्शी निविदा पद्धत राबविणे
  •   सुपरवायझरच्या कामाची होणार झाडाझडती
  •   संकलन आणि मार्केटिंगवर विशेष भर
  •   पशुखाद्याची गुणवत्ता सुधारणार

Back to top button