खासदार डॉ. अमोल कोल्हे होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी! | पुढारी

खासदार डॉ. अमोल कोल्हे होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी!

पुणे;  पुढारी वृत्तसेवा : खासदार डॉ. अमोल कोल्हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदा प्रवेश घेणार आहेत. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनिती विषयी अधिक जाणून घेण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि राष्ट्रबांधणी’ या विषयात नुकताच सुरू केलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (P. G. Diploma in Chhatrapati Shivaji Maharaj’s Vision and Nation Building) कोर्सला प्रवेश घ्यायचे त्यांनी निश्चित केले आहे.

प्रवेशासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी डॉ. कोल्हे यांनी शुक्रवारी चर्चा केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या डिफेन्स अॅण्ड स्ट्रेटेजिक स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे आणि डॉ. प्रफुल्ल पवार हे देखील उपस्थित होते. 

डॉ.कोल्हे म्हणाले, कुलगुरू डॉ. करमळकर यांनी मराठा साम्राज्यावरील अध्यासन आणि अभ्यासक्रमाचा तपशील सांगितला. एकूण ८०० गुणांचा हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, जगभरातील योद्धे आणि शिवाजी महाराज, युद्ध शैली, महाराजांची जन्मभूमी ते कर्मभूमी हा प्रवास आदींचा समावेश या अभ्यासक्रमात आहे. त्याचबरोबर लघुशोध प्रबंधही सादर करावा लागणार आहे. या अभ्यासक्रमाला तंजावरचे शिवाजी महाराज यांचे मार्गदर्शन असून छत्रपती शिवाजी महाराजांवरील संशोधनातून नवीन तथ्ये बाहेर येण्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. करमळकर यांनी व्यक्त केला.

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोस्ट गॅज्युएशनचा अभ्यासक्रम हे स्तुत्य पाऊल वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास वाढायला हवा. अनेक तरुणांना महाराजांना जाणून घेता येईल. महाराजांना आणखी जाणून मला ही घ्यायचंय. अर्थव्यवस्था, व्यवस्थापन कौशल्य आणि इतर सर्व जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी हा अभ्यासक्रम निश्चितच उपयोगी ठरेल. यासाठी मी स्वतः विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊ इच्छितो आणि एक शिवप्रेमी म्हणून पाहिजे ती मदत मी करेल.” 

यासोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघातील आदिवासी भागात प्रस्तावित ‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन इन्स्टिट्यूट’ची उभारणी करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा याबाबतही सविस्तर चर्चा झाली. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत कुलगुरू डॉ.करमळकर सरांनी या संदर्भात विद्यापीठ प्रशासन नक्की पुढाकार घेईल, असे आश्वासन दिले आहे.

Back to top button