शाहू जन्मस्थळाचे काम अजून किती वर्षे चालणार? | पुढारी

शाहू जन्मस्थळाचे काम अजून किती वर्षे चालणार?

कसबा बावडा ; पवन मोहिते : येथील शाहू जन्मस्थळ विकासाचे काम अजून किती वर्षे चालणार, असा संतप्त  सवाल शाहूप्रेमींतून विचारला जात आहे. एकूणच जन्मस्थळ विकासासाठी  आतापर्यंत 8 कोटी 56 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. संग्रहालयाचा 13 कोटी 40 लाख रुपयांचा आराखडा शासनास सादर असून यापैकी पहिल्या टप्प्यातील  कामे पुन्हा सहा महिन्यांपासून सुरू झाली आहेत. 2004 पासून कामे सुरू आहेत. 

अधिक वाचा : कोल्हापूर जिल्ह्याची सुटका नाहीच; निर्बंध कायम

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या ‘लक्ष्मीविलास पॅलेस’ या  जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी  उपलब्ध होत आहे. सन 2004 पासून गेली अनेक वर्षे या वास्तूचे काम सुरू आहे. शाहू जयंती निमित्त कार्यक्रम होताना, जतन, वारसा आणि विकास कामे निरंतर  सुरू असल्याने याची चर्चा होत असते.

अधिक वाचा : छत्रपती शाहू जयंती विशेष : काकांचे परदेशातील शिक्षण अन् आजीची काळजी!

1989-90 मध्ये ना. शरद पवार यांच्या माध्यमातून या वास्तूसाठी 12 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. 2004 मध्ये केंद्र सरकारच्या स्मारके वारसा जतन योजनेतून या  वास्तूसाठी 34 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. केंद्र सरकारच्या वित्त  आयोगातून 2007 मध्ये 1 कोटी 14 हजार रुपयांचा निधी मिळाला होता. 2009 ते  2012 दरम्यान आवश्यक ते नुसार 4 कोटी 19 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यात आला.

अधिक वाचा : छ. शाहू जयंती विशेष : लोकराजामुळेच जिल्हा बनला पाणीदार

2012-13 पुरातत्व वस्तुसंग्रहालय विभाग  महाराष्ट्र शासन यांच्याकडून 1 कोटी 36 लाख रुपयांचा निधी सार्वजनिक  बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. यातून जन्मस्थळ आणि सभोवताली असणार्‍या  सुरक्षा भिंतीची स्थापत्य कामे करण्यात आली. मार्च 2015 पर्यंत स्थापत्य  कामे सुरू होती. आतापर्यंत जन्मस्थळाच्या विकास आणि संवर्धन कामासाठी एकूण 8 कोटी 56 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

वस्तुसंग्रहालयाचा 13 कोटी  40 लाख रुपयांचा आराखडा  राज्य शासनाला सादर करण्यात आला. एकाच वेळी इतका निधी खर्च होणार नसून याचे टप्पे करण्याचा निर्णय झाला, त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 2 कोटी 8  लाखांच्या कामाला 2016-17 मध्ये पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाची प्रशासकीय मान्यता मिळाली. डिसेंबर 2019 पासून वस्तुसंग्रहालयाचे काम बंद होते, वर्कऑर्डर दिल्यापासून संबंधित ठेकेदाराने पेंटिंग, फोटो कंजर्वेशन, स्क्रीनिंग,  लाकडी काम यासह इतर सुमारे 70 लाखांची कामे केल्याचे समजते. त्याची बिले निधीअभावी मंजूर करण्यात आली नाही.

आमदार चंद्रकांत जाधव यांनी समितीचे काही सदस्य आणि पुरातत्त्व  विभागातील अधिकार्‍यांची बैठक घेऊन काम पुढे सुरू ठेवण्यासाठी सूचना केल्या, त्यानुसार गेले सहा महिने इतिहास अभ्यासक 

इंद्रजित सावंत व वसंत मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पेंटिंगची कामे सुरू आहेत. जुने चित्रकार बदलून चार नव्या चित्रकारांना संधी देण्यात आली आहे. रथ आणि राज्याभिषेक सेट यांचे काम प्रगतिपथावर आहे.

उपसमितीच नियमबाह्य

2017-18 मध्ये एक कोटीची वित्तीय मान्यता मिळाली. यानंतर संग्रहालयाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली; पण सुरू असलेली कामे ऐतिहासिक पुराव्यांना धरून नाहीत अशी उपसमितीने बाजू मांडली; पण उपसमितीच नियमबाह्य आहे, असे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे राहिले. 

 

Back to top button