राज्य सरकारने कृषी विधेयक मागे घ्यावे : राजू शेट्टी | पुढारी

राज्य सरकारने कृषी विधेयक मागे घ्यावे : राजू शेट्टी

मुंबई/जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारने येत्या अधिवेशनात कृषी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक पारित करणार असल्याचे समजते. मात्र राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकरी संघटनाशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा. अन्यथा केंद्रसरकारने जसा घाईगडबडीत कृषी विधेयके केली. तसाच प्रकार राज्य सरकार या सुधारणामध्ये करत असल्याचे वाटत आहे. यामुळे राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटातून जात आहेत. प्रचंड संख्येने झालेल्या व अजुनही न थांबलेल्या शेतकरी आत्महत्या हे त्याचे दृष्य रुप आहे. त्यामुळेच खते, बियाणे, कीटकनाशके या शेतीसाठी आवश्यक असलेल्या निविष्ठा योग्य गुणवत्तेच्या रास्त भावात मिळाव्यात, सिंचनसुविधा वाढवल्या जाव्यात. शेतीसाठीची वीज पुरेशा दाबाने योग्य भावात मिळावी. कमी व्याजदरातील शेतीसाठीच्या कर्जाची उपलब्धता वाढवावी. शेतकर्‍यांना शेतमाल साठवणुकीच्या सोई, शीतगृहांची सुविधा वाढवावी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामीनाथन समिती शिफारशीप्रमाणे शेतमालाला उत्पादनखर्च आणि 50 टक्के नफा (सी 2+50 टक्के) असा हमीभाव मिळण्याची यंत्रणा उभी करावी. अशा मागण्या आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रांनी 2020 मध्ये आणलेले नवीन कायदे आणि सुधारणा या शेतकर्‍यांसाठी मारकच आहेत. हमीभाव रहाणार अस मोघमपणे सरकार सांगत असले तरी व्यापारी, मोठ्या कंपन्या यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करता येणार नाही, असा कुठलाही उल्लेख या नवीन कृषी कायद्यांमधे नाही. येत्या अधिवेशनात आपण शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभे राहण्याचा व केंद्रीय कायद्यांना विरोध करणारा स्पष्ट ठराव करावा अशी मागणी केली आहे. याबाबत काही मुद्दे सध्या अस्तित्वात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांच्या हिताच्या आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. कायद्यातील सुधारणांचा मसुदा किमान 15 दिवसांसाठी चर्चेसाठी सर्वाना उपलब्ध असावा व भूमी अधिग्रहण कायद्यात 2013 च्या कायद्यानुसार पुन्हा मान्यता देण्यात यावी.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, मेघा पाटकर, प्रतिभा शिंदे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकुस्ते, एस.व्ही.जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

Back to top button