स्मशानभूमी परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी समिती  | पुढारी

स्मशानभूमी परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी समिती 

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्गामुळे मृत्यमुखी पडलेल्यांचे दहन केल्यानंतर स्मशानभूमी परिसरात होत असलेल्या प्रदूषणाच्या तक्रारीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. हे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समिती स्थापन केली आहे. 

पुणे शहराच्या माध्यभागी असलेल्या स्मशानभूमीत कोरोनाने मरण पावलेल्यांचे दहन केले जात आहे. स्मशानभूमीत असलेल्या अपुऱ्या सोयींमुळे उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे प्रदूषण निर्माण होत असून हे प्रदूषण रोखावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका पुण्यातील विक्रांत लाटकर व आनंदबाग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केली होती. या याचिकेची दखल घेत प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजण्याकरिता समिती नेमा. असा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. 

त्यानुसार सरकारने समिती नेमली आहे. हवा नियंत्रण प्रदूषण कक्षाचे तांत्रिक सल्लागार, मुंबई व पुणे महापालिकेचे प्रतिनिधी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई व पुण्यातील प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली आहे. लाटकर यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केलेल्या तक्रारीनंतर लवादाने आदेश दिला होता. या आदेशाचा तसेच लवादाने केलेल्या सूचनांचा अभ्यास करावा, स्मशानभूमीतून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारावी. त्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Back to top button