व्हॅक्सिन पुन्हा आऊट ऑफ स्टॉक | पुढारी

व्हॅक्सिन पुन्हा आऊट ऑफ स्टॉक

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे लसीकरणाचा वेग वाढविण्याचा दावा जिल्हा प्रशासन करत  असले तरी प्रत्यक्षात मात्र रविवारी अनेक ठिकाणी ‘व्हॅक्सिन आऊट ऑफ स्टॉक’ असे फलक झळकले होते. रांगेत थांबूनही लस मिळत नसल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्‍त करण्यात आला.

राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण रविवारी अनेक ठिकाणी लोकांना लस मिळालीच नाही. नोंदणी केलेल्या आणि पहिला डोस घेतलेल्या लोकांच्या मोबाईलवर लसीकरणाबाबत संदेश आला आहे. त्यामुळे अनेक जण लसीकरण केंद्राकडे गेले होते. जिल्हा रुग्णालय आणि इतर ठिकाणीही लस उपलब्ध नसल्याचे फलक लावण्यात आले. अनेक जण सकाळीच रांगेत थांबले होते. त्यांनाही आज लस मिळणार नाही, असे सांगून माघारी पाठवण्यात आले.आरोग्य खात्याच्या या सावळ्या गोंधळाबद्दल संताप व्यक्‍त होत आहे. 

जिल्ह्यात 143 नवे रुग्ण; 232 डिस्चार्ज

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली असून, रविवारी 143 जणांना बाधा झाली, तर 232 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 143 जण बाधित आले आहेत. शहर आणि तालुक्यात 90 जणांना संसर्ग झाला आहे. जिल्ह्यात सध्या 1777 जणांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा कमी होत होता; पण रविवारी या आकड्यात किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांनी पुन्हा खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. रविवारी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 771 झाली आहे.

Back to top button