लसीच्या टोकणसाठी सर्वसामान्यांची परवड | पुढारी | पुढारी

लसीच्या टोकणसाठी सर्वसामान्यांची परवड | पुढारी

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कोरोना लसीच्या कमतरतेमुळे रात्रीपासून नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. परंतु, राजकीय व प्रशासकीय ओळखीतून होणार्‍या टोकण घोटाळ्यामुळे टोकण मिळण्यासाठी रांगा लावणार्‍या सर्वसामान्य नागरिकांची मात्र परवड होत आहे. त्यामुळे टोकणच्या योग्य वाटपाबाबत जिल्ह्यातील केंद्रांवर योग्य कार्यपद्धती लावणे अत्यावश्यक बनले आहे. 

वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद  आहेत. अत्यावश्यक सेवाही दुपारी दोनपर्यंत सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची विशेषत: व्यापारी व हातावरचे पोट असणार्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत कोरोना लसीकरण वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, लस घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या तुलनेत अत्यंत कमी डोस उपलब्ध होत आहेत. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 31 लाख आहे. त्यामध्ये शासनाच्या नियमानुसार लस घेण्यासाठी पात्र असलेल्या 18 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या 21 लाख आहे. त्यापैकी आत्तापर्यंत नऊ लाख 50 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे अजूनही साडे दहा लाख नागरिकांना लसीकरणाची प्रतीक्षा आहे. तरीही जिल्ह्यातील आठवड्याला काही हजारातच लस मिळत आहे. त्यातच कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्यात वाढत असल्याने लसीकरणासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून घेण्याची प्रशासनाला संधी आहे. परंतु, लसीकरणासाठी असलेल्या रांगांमुळे अनेकांची मानसिकता बदलू लागली आहे. 

लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी टोकण पद्धत सुरू केली आहे. परंतु, समन्यायी पद्धतीने टोकण देण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी पार पडत नाही. लस देणार्‍या आरोग्य यंत्रणा, राजकीय पदाधिकारी, अन्य प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या प्रभावात दररोज टोकण दिली जातात. दुसरीकडे लस मिळण्यासाठी नागरिक रात्री दहा-अकरापासून लसीकरण केंद्रावर मुक्कामी येत आहेत. अनेक जण पहाटे चार-पाचपासून रांगेत उभे राहतात. अशा नागरिकांवर टोकण घोटाळ्यामुळे अन्याय होत आहे. अनेकांना टोकण मिळाल्यानंतरही लस संपली, असे सांगितले जाते. त्यामुळे त्या टोकणची लस दिली कुणाला, असाही प्रश्न निर्माण होतो. 

Back to top button