सातारा जिल्ह्यात बाधितांची पुन्हा हजारी पार | पुढारी

सातारा जिल्ह्यात बाधितांची पुन्हा हजारी पार

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाचा कहर पुन्हा वाढताना दिसत आहे. बाधितांचा आकडा पुन्हा 1 हजार पार गेल्याने जिल्हावासीयांना धडकी भरली आहे. तर मृत्यूचे सत्र आजही सुरूच आहे. बुधवारी 1 हजार 170 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 2 लाखांच्या समीप आला आहे. दिवसभरात 18 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दिवसभरात 693 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात गेल्या 17 महिन्यांपासून कोरोनाचा आलेख सुरूच आहे. दुसर्‍या लाटेत बाधित आणि मृत्यूच्या आकड्यांचे नवे विक्रम पाहण्यास मिळाले. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून हा आलेख ओसरताना दिसत होता. मात्र, पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांच्या घरात गेल्याने जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्हिटी रेट वाढू लागल्याने आणखी काही दिवस निर्बंध राहण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून 800-900 च्या घरात असणारा बाधितांचा आकडा बुधवारी 1170 इतका गेला तर पॉझिटिव्हिटी रेट हा 8-9 टक्के असणारा तब्बल 11.15 टक्के झाला असल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.

बुधवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जावली 24, कराड 382, खंडाळा 54, खटाव 43, कोरेगाव 142, माण 42, महाबळेश्वर 8, पाटण 73, फलटण 61, सातारा 226, वाई 101 व इतर 14 असे 1170 बाधित आढळले आहेत. तर जावली 1, कराड 8, कोरेगाव 2, माण 1, फलटण 4, सातारा 1 व इतर 1 अशा 18 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कराड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक 

कराड : पुढारी वृतसेवा 

कराड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी दिवसभरात 382 नवे रुग्ण आढळून आल्याने तालुका हादरला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना प्रशासनाने व आरोग्य विभागाकडून गांभीर्याने खबरदारीचे उपाय राबविले जात नसल्याने बाधित रुग्ण धास्तावले आहेत. 

सोमवारी दिवसभरात 323 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मंगळवारी यात आणखी भर पडली आहे. दिवसभरात 382 रूग्ण आढळून आले आहेत. बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.  

कराड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय बाधितांची आकडेवारी पुढील प्रमाणे- हेळगाव 14, इंदोली 15, काले 62, कोळे 25, मसूर 21, रेठरे बु. 37, सदाशिवगड 42, सुपने 22, उंब्रज 24, वडगाव हवेली 56, येवती 11 तर उपजिल्हा रूग्णालयांतर्गत 53 बाधित आढळून आले आहेत. काले, वडगाव हवेली, रेठरे बु, सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कृष्णा कारखाना निवडणुकीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. कृष्णा काठी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.   

बाधितांना गृहविलगीकरणात ठेवू नये अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. तरीही अनेक रूग्ण घरी उपचार घेत आहेत. कन्टेंनमेंट झोन व सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करण्याकडेही दुर्लक्ष झाले आहे.  त्यामुळे कोणत्या घरात बाधित आहेत, हेच कळत नाही. शहरात व निमशरी भागात ही समस्या तेथील रहिवाशांना भेडसावत आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास या बाबी कारणीभूत ठरत आहेत. 

Back to top button