तीस हजार वीज कनेक्शन तोडले | पुढारी

तीस हजार वीज कनेक्शन तोडले

सोलापूर : प्रताप राठोड

गेल्या अनेक वर्षांपासून थकीत वीज बिलापोटी महावितरणने आता थेट कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील 30 हजार कनेक्शन महावितरणने कापले आहेत. गेल्या दोन आठवड्यांत ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना काळात महावितरणने हा ग्राहकांना महाशॉक दिल्याने जनतेतून उलटसुलट चर्चा सुरू आहे.

कोरोनाच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षांपासून उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अथर्र्चक्रच कोलमडले आहे. याचा परिणाम म्हणून वीज बिल थकबाकी वाढत गेली. त्यातच वीज बिल माफीसंदर्भातही आंदोलने, मोर्चे झाले. गेल्यावर्षी विधिमंडळ अधिवेशनही गाजले होते; परंतु वीज बिल माफीचा निर्णय झालाच नाही. त्यामुळे महावितरणने सुलभ हप्त्यात वीज बिल वसुली सुरूच ठेवली आहे.

दरम्यान,  जिल्ह्यामध्ये मे महिनाअखेर तब्बल दोनशे कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी होती. त्यामुळे वीज बिल भरा; अन्यथा वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार वसुली मोहीम राबवत बिल न भरणार्‍या धारकांची कनेक्शन तोडण्यात येत आहे.

घरगुती, व्यापारी, औद्योगिक तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिकेचे पाणीपुरवठा आणि पथदिव्यांचेदेखील वीजबिल थकीत होते. बिजबील भरण्यासंदर्भात तोंडी तसेच एसएमएसच्या माध्यमातून महावितरणने सूचना दिल्या होत्या. मात्र अनेकांनी विजबिल न भरल्यामुळे महावितरणकडून कारवाई चालू करण्यात आली आहे.

याअंतर्गत ग्रामपंचायत आणि नगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे दोन हजार कनेक्शनचे 72 कोटी रूपये थकीत होते. त्यांनाही बील भरण्याची नोटीस देण्यात आली होती. तरी देखील बील न भरल्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून कनेक्शन तोडण्याची बेधडक मोहीम सुरू केली. यातून आतापर्यंत शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे एक हजार 185  कनेक्शन  तोडण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत पाणीपुरवठा संदर्भात 38 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. ग्रामविकास खात्याने पंधराव्या वित्त आयोगाने वीज बिल भरण्याची तरतूद केली आहे. यामुळे उर्वरित थकीत वीज बिल वसूल होण्याचा महावितरणचा मार्ग सुकर झाला आहे. 

शहरातील पथदिव्यांचीदेखील मोठ्या प्रमाणावर बिले थकीत होते. यासंदर्भात सूचना देऊनही महापालिकेने बिल भरले नाही. त्यामुळे पथदिव्याचे 1 हजार 890 कनेक्शन महावितरण विभागाने खंडित केले आहेत. मे महिन्याअखेर सोलापूर जिल्ह्यातील महावितरण विभागाची थकीत बीजबिल हे 200 कोटी पैकी 108 कोटी रुपये वसूल झाले आहेत. यापुढील काळातदेखील वीज बिलवसुली आणि त्यासाठी वीजतोडणी मोहीम चालूच राहणार आहे. दरम्यान, महावितरण विभागाने केलेल्या या कारवाईमुळे ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी अंधार पसरला आहे. दुसरीकडे एक हजारहून अधिक पाणीपुरवठा कनेक्शन कट करण्यात आल्यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नदेखील निर्माण झाला आहे.

 

Back to top button