कोरोना वरील गोळी बाजारात उपलब्ध | पुढारी

कोरोना वरील गोळी बाजारात उपलब्ध

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : कोरोना वरील उपचारांसाठी आपल्या देशातही आता सर्वात स्वस्त असलेली ‘मोल्नुपिरावीर’ ही गोळी उपलब्ध झाली आहे. या गोळ्या सतत पाच दिवस घ्यावयाच्या आहेत. त्यांची किंमत 1 हजार 399 रुपये आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाला देण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त गोळी ठरणार आहे. या गोळीमुळे सौम्य लक्षणे असणार्‍या कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘मोल्नुपिरावीर’ (800 एम.जी.) ही अँटिव्हायरल गोळी आहे. 18 वर्षांवरील रुग्णांना कोरोनाचा सौम्य संसर्ग असेल, तर गोळी दिवसातून दोनवेळा अशी 5 दिवस घ्यायची आहे.

सोमवारी ही गोळी बाजारात उपलब्ध झाली आहे. लवकरच देशभरात सर्वत्र ती उपलब्ध झालेली असेल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. जून 2021 मध्ये भारतीय औषध नियामक मंडळाने या गोळीच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी विविध औषध कंपन्यांना परवानगी दिली होती.

मॅनकाईंड फार्मा आणि बीडीआर फार्मास्युटिकल्सने मिळून दिल्ली आणि काही भागात ‘मॉल्युलाईफ’ ही गोळी आणली. पुढे सन फार्माने ‘मॉलक्स्विर’ गोळी बाजारात आणली.

या गोळीला ब्रिटन औषध नियामकांसह अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे, हे विशेष! भारतात सन फार्मा, सिप्ला, टॉरेंट, एम्क्युअर आणि डॉ. रेड्डी या कंपन्यांकडे ‘मोल्नुपिरावीर’ गोळ्यांचे उत्पादन आणि पुरवठ्याचे हक्क आहेत. शंभरावर गरीब आणि मध्यमवर्गीयबहुल देशांनाही या कंपन्या गोळ्या निर्यात करणार आहेत.

हेटेरो, सन फार्मा, नॅट्को आणि डॉ. रेड्डीसह डझनोगणती कंपन्या ‘मर्क’ आणि ‘रिजबॅक बायोथेरपिटिक्स’ने मिळून तयार केलेल्या या ‘ओरल थेरपी’च्या फॉर्म्युल्यावर काम करत आहेत. या अँटिव्हायरल गोळ्या कोरोना महामारीत गेमचेंजर ठरणार असल्याचा दावाही केला जात आहे.

‘ओमायक्रॉन’ निदान किटला परवानगी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या ओमायक्रॉन स्ट्रेनचा वेगाने फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या स्ट्रेनचे लगेच निदान करणारे ‘ओमिश्युअर’ नावाचे एक किट टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक कंपनीने तयार केले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने किटला परवानगी दिली आहे. कोरोना रुग्णात या स्ट्रेनचा विषाणू आहे की नाही, हे शोधण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करावे लागते, त्याला वेळ लागतो; मात्र ओमिश्युअर किटमुळे कमी वेळेत ओमायक्रॉन स्ट्रेनचा शोध घेता येईल.

Back to top button