२०१४ मध्ये राष्ट्रवादीने धोका दिला : नाना पटोले | पुढारी

२०१४ मध्ये राष्ट्रवादीने धोका दिला : नाना पटोले

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धोका झाला. तेव्हा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटली होती. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे, अशी स्वबळाची भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी पुन्हा मांडली. मी स्वबळाच्या भूमिकेवर ठाम आहे, असा इशारा नाना पटोले यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दिला.

सह्याद्री अतिथीगृहावर पटोले यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीला नाना पटोले उपस्थित नव्हते.

पवारांकडील बैठकीबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले, मी कुणावरही नाराज नाही; पण मला पवार यांचे निमंत्रण नव्हते. नानांना घेऊन या, असाही निरोप नव्हता. मला त्या भेटीची माहितीही नव्हती. आमचे नेते त्यांना भेटल्यावर मी विचारले, त्यावर त्यांनी मला सांगितले की, ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यामुळे माझा राग वगैरे काहीही नाही. मी माझ्या पक्षाचे काम करत आहे. माझ्या पक्षाचे काम करताना जर कोणाला राग येत असेल तर मला काही अडचण नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

काँग्रेसला धोका दिला

2014 मध्ये देशात मोदींचे सरकार आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला. काँग्रेसशी धोका झाला. हा अनुभव बघता काँग्रेस 2024 च्या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरणार असल्याचा इशारा पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.

भाजपविरोधात आंदोलन

आगामी निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. महाआघाडीत कोणतेही फेरबदल सध्या तरी नाहीत. हायकंमाड निर्देश देतील त्यावर मी काम करतो. भाजपला पर्याय फक्‍त काँग्रेस आहे. भाजपने ओबीसींचे आरक्षण संपवले. त्याविरोधात राज्यात आम्ही आंदोलन करणार आहोत, असे पटोले यांनी सांगितले.

मी माझ्या पक्षाचं काम करत आहे. 2024 मध्ये काँग्रेस पक्ष देशात सरकार बनवेल. पक्षाचे काम पक्ष करत आहे. सरकार सरकारचं काम करेल. मला भाजपवर टीका करायची जबाबदारी दिली आहे, असेही पटोले म्हणाले.

राज्यपालांना भेटायला सायकलवरून जाणार

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर गुरुवारी दुपारी 12 वाजता सायकलवरून राजभवनावर जाणार आहे आणि राज्यपालांना काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Back to top button