कोरोना मृत्यूची कारणे शोधा; केंद्रीय पथकाची आरोग्य यंत्रणेला सूचना | पुढारी

कोरोना मृत्यूची कारणे शोधा; केंद्रीय पथकाची आरोग्य यंत्रणेला सूचना

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोना मृत्यूची कारणे शोधा अशा सुचना केंद्रीय पथकाने आरोग्य यंत्रणेला दिल्या. जिल्ह्यातील वाढते कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आलेल्या केंद्रीय आरोग्य पथकाने कोरोना मृत्यूची कारणे शोधा, गाव आणि तालुक्यातील आरोग्य यंत्रणा गतिमान करा, लसीकरणाची गती वाढवा, अशा सूचना गुरुवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि सीपीआरमध्ये स्वतंत्र बैठका घेत पथकाने कोरोना स्थितीचा आढावा घेतला. कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी आणखी तीन आठवडे लागतील, असे निरीक्षणही पथकाने नोंदवले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे मृत्यू ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 72 तासांच्या आत आणि त्यानंतर मृत्यूची कारणे शोधा, डेथ ऑडिट करा, अशीही सूचना केंद्रीय आरोग्य पथकानेसीपीआरसह जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिली.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आणि मृत्यू चिंताजनक बाब आहे. हा संसर्ग कमी होण्यास अजून 3 आठवड्यांचा अवधी लागणार आहे.

त्यानंतर हा संसर्ग नीचांकी पातळीवर येईल. त्यासाठी गाव, तालुका, जिल्हास्तरावरील यंत्रणांनी कार्यक्षमपणे काम केले पाहिले. त्यासाठी नियोजन करा. वेळेत तपासणी, औषधोपचार झाल्यास मृत्यू दरही कमी होईल. रुग्णालयात एचएमआयची व्यवस्था तयार करा. उपचाराची प्रिस्क्रिप्शनदेखील अपडेट ठेवा, अशी सूचना पथकाडून सीपीआरसह आरोग्य यंत्रणेला देण्यात आली.

गुरुवारी सायंकाळी केंद्रीय आरोग्य पथकाने सीपीआरला भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पथकाने कोरोना संसर्ग, मृत्यू दर यावर तब्बल सव्वादोन तास चर्चा केली.

पथकात राज्य सर्वेक्षण विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, प्रादेशिक कार्यालय आरोग्य व कुटुंबकल्याण पुण्याचे उपसंचालक डॉ. प्रणील कांबळे, एम्स हॉस्पिटल नागपूरचे पल्मोनरी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सत्यजित साहू यांचा समावेश होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनामृत्यूवाढीवर चिंता व्यक्त

राज्यातील अन्य जिल्ह्यांतही कोरोना संसर्ग होता. ठराविक कालावधीनंतर तो कमी झाला; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आणि मृत्यूवाढीची कारणे काय, असा सवाल करून पथकाने चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात सूक्ष्म नियोजन होते. हा अनुभव पाठीशी असतानाही दुसर्‍या लाटेत मृत्यू आणि संसर्गाचा उद्रेक होण्याची कारणे काय, असा प्रश्नही केंद्रीय पथकाने उपस्थित केला.

अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, सीपीआरमध्ये कोरोनाबाधितांसाठी उपचारांच्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना जीवदान मिळाले; पण काही रुग्ण गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल झाल्याने मृत्यू होत आहेत. स्वॅब चाचण्याही वाढविल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी जिल्ह्यात चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हाय रिस्क, लो रिस्क रुग्णांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी वैद्यकीय यंत्रणा तळागाळापर्यंत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बर्गे, डॉ. अनिता सैबन्नावार, डॉ. अजित लोकरे, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. संगीता कुंभोजकर, डॉ. अनीता परितेकर, डॉ. मारुती पवार आदी उपस्थित होते.

रुग्णांच्या फाईलची तपासणी

पथकाने सीपीआरमध्ये उपचार घेणार्‍या काही रुग्णांच्या केसपेपर फाईल मागवून घेतल्या. काय औषधोपचार केले याची तपासणी केली. अहवाल कधी पॉझिटिव्ह आला, त्यानंतर रुग्ण किती दिवसांत रुग्णालयात दाखल झाला, त्यापूर्वी तो कोठे उपचार घेत होता, याबाबत सविस्तर माहिती पथकाने घेतली. रुग्णाची प्रिस्क्रिप्शन फाईल अद्यायवत ठेवण्याची सूचनाही करण्यात आली.

लसीकरणावर १०० % भर द्या

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात नागरिकांच्या शंभर टक्के लसीकरणावर भर द्या, अशी सूचना कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्य पथकाने गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिली.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या चार आठवड्यांतील जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी आलेख उतरत चालला आहे. अन्य शहरांच्या तुलनेत कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट हा एक महिना उशिराने कमी होत चालला असला, तरी ही समाधानकारक बाब आहे. मृत्यूचे प्रमाण हे 2.9 वरून 2.6 टक्के आल्याचेही पथकातील सदस्यराज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या केंद्रीय पथकात डॉ. आवटे यांच्यासह पुण्याच्या प्रादेशिक कार्यालयातील आरोग्य व कुटुंबकल्याण उपसंचालक डॉ. प्रणील कांबळे, नागपूर एम्स हॉस्पिटलच्या पल्मोनरी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सत्यजित साहू यांचा समावेश होता.

ॉजिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिसप्रमुख शैलैश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग, मृतांची संख्या, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण याची पथकाला माहिती दिली.

लसी वाया जाण्याचे प्रमाण शून्य

आढावा बैठकीत प्रथम शहरातील कोरोना संसर्गाची माहिती देण्यात आली. शहरातील कोव्हिड सेंटर, खासगी रुग्णालयांत होणारे उपचार, मृत्यूची संख्या, याची माहिती डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. शहरात उपलब्ध झालेली लस शंभर टक्के वापरण्यात आली. लस वाया जाण्याचे प्रमाणे शून्य टक्के होते. आरोग्य यंत्रणेकडून दररोज 50 हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची तयारी आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसेल, असा आशावादही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

सध्या उपलब्ध होत असलेल्या लसीपैकी 90 टक्के लस ही दुसर्‍या डोससाठी, तर 10 टक्के लस पहिला डोस घेणार्‍यांसाठी देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या लसीकरणाबाबत पथक समाधानी

लसीकरणामध्ये राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतल्याबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाने समाधान व्यक्त केले.

या पथकाकडून जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण, डेथ ऑडिट, एकूण लसीकरण, पूरस्थितीतील संभाव्य आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजन स्थिती, तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात येणार्‍या उपाययोजना, टेस्टिंग, म्युकर मायकोसिस, कंटेन्मेंट झोन आदींचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे रवी शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. फारूक देसाई आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, कोरोना संसर्गाचा आलेख उतरत आहे.

जिल्ह्यात लसीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. 60 वर्षांवरील 78 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

गेल्या चार आठवड्यांच्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीची तुलना करता बाधितांचे प्रमाण कमी होत आहे.

आजमितीला पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या आत आला आहे.

मृत्यूचे प्रमाण 2.9 टक्के होते, ते आता 2.6 टक्क्यांवर आले आहे.

मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व डॉक्टरांकडून सुरू असलेले प्रयत्न सकारात्मक आहेत.

Back to top button