विरोधकांच्या अपप्रचारामुळे लोकसभेत पराभव : प्रफुल पटेल | पुढारी

विरोधकांच्या अपप्रचारामुळे लोकसभेत पराभव : प्रफुल पटेल

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दहा वर्षात देशात अनेक विकासकामे झालीत. समाजातील प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून सरकारवर निरर्थक आरोप करण्यात आले. संविधान बदलणार असा अपप्रचार करुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला. परिणामी, भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय नेते खा. प्रफुल पटेल यांनी दिली. आज (दि.15) ते भंडारा येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, मागील दहा वर्षात केंद्र तथा राज्य सरकारने शेतकरी, तरुण, गरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या. धानाला बोनस, किसान सन्मान निधी, लाखो लोकांना घरकूलाचा लाभ, आयुष्यमान योजना राबविण्यात आल्या. रस्ते, सिंचनाचे जाळे तयार करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी घटकपक्ष म्हणून आम्ही काम केले. युती धर्म पाळला.

परंतु, विरोधी पक्ष एकत्र आल्याने त्यांनी सरकारविरुद्ध अपप्रचार करण्यास सुरुवात केली. भारताचे संविधान बदलणार, आरक्षण रद्द होणार असे सांगून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला. तरीसुद्धा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना याबाबत समजावून सांगितले. परंतु, विरोधकांनी मतदारांची दिशाभूल केल्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. मतदारांपुढे आम्ही आमची बाजू मांडण्यात कमी पडलो, असेही त्यांनी सांगितले. तसेच संविधान बदलणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास आम्हीच पहिल्यांदा त्याला विरोध करु, असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. त्याठिकाणी जागा जरी कमी मिळाल्या तरी एनडीएच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. २०१९ पेक्षा ही मते कमी नाहीत. यापुढे देशात अनेक आव्हाने असणार आहेत. पुढील पाच वर्षात देशाला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे खा. पटेल म्हणाले.

मतदारांपर्यंत पोहचून बाजू मांडू

येत्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत लोकांमध्ये विरोधकांनी निर्माण केलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. मतदारांपर्यंत पोहचून आम्ही आमची बाजू मांडून यशस्वीपणे तो दूर करु . विधानसभेत एनडीएचीच सत्ता येणार, असा विश्वास खा. प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

‘इंतजार का फल मिठा होता है’

केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळाले नसल्याच्या प्रश्नावर खा. प्रफुल पटेल यांनी ‘इंतजार का फल मिठा होता है, असे सांगत भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळात नक्कीच आपल्याला स्थान मिळेल, असे सूचकपणे सांगितले.

Back to top button