मधमाशा करणार फुफ्फुसाच्या कर्करोगाचे अचूक निदान!, मिशीगन विद्यापीठाचा दावा | पुढारी

मधमाशा करणार फुफ्फुसाच्या कर्करोगाचे अचूक निदान!, मिशीगन विद्यापीठाचा दावा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मधमाशा माणसांच्या ऊती संवर्धनातील केवळ गंध घेऊन फुफ्फूसाच्या कर्करोगाचे निदान करू शकतात, असा शोध “मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ़ इंजिनियरिंग आणि इंस्टिट्यूट फ़ॉर क्वांटिटेटिव हेल्थ सायन्स अॅंड इंजिनियरिंग या दोन संस्थांनी लावलेला आहे.

मधमाशांमध्ये विविध ऊती संवर्धनात गंध ओळखण्याची वेगळी क्षमता असते. या गंधावरून मधमाशा माणसांच्या फुफ्फुसांना जडलेल्या कर्करोगाचे योग्य निदान करू शकतात, असे या संस्थांनी संशोधनातून स्पष्ट केले आहे. मधमाशा माणसांच्या फुफ्फूसांना ग्रासलेल्या कर्करोगाशी संबंधित बायोमार्करची रासायनिक घनता तपासू शकतात. त्यामुळे कर्करोगाचे वेळीच निदान होऊ शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

संशोधनाबाबत सविस्तर माहिती देताना मिशीगन विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक देवजीत साहा म्हणाले की, किटकांमध्ये कुत्र्यांप्रमाणेच सुंगण्याची अद्भूत क्षमता असते. निरोगी व्यक्तीच्या श्वासांमध्ये उपलब्ध रसायने आणि कर्करुग्णांच्या श्वासातील रसायनांमधील फरक मधमाशा चांगल्याप्रकारे ओळखू शकतात.

मधमाशांनी रसायनातील अत्यंत कमी घनतेचाही अगदी सहजतेने शोध लावला. माणसांच्या श्वासांमधील रासायनिक मिश्रणाची सुक्ष्म घनता मधमाशांनी ओळखली असल्याचे साहा यांनी सांगितले. संशोधनादरम्यान माणसांच्या फुफ्फूसातील कर्करोगांच्या पेशी एका हवाबंद फ्लास्कमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर फुफ्फूसांच्या कर्करोगाने ग्रस्त व्यक्तींच्या ऊती संवर्धनाचा गंध घेण्यासाठी मधमाशांना सोडण्यात आले.

मधमाशांच्या गंधाचे परीक्षण करण्यासाठी सेन्सरचा वापर करण्यात आला. मधमाशा फुफ्फूसांच्या कर्करोगाने ग्रस्त पेशी आणि निरोगी शरीरातील पेशींच्या गंधामधील अंतर पटकन ओळखू शकतात. त्यावरून मधमाशांचा उपयोग फुफ्फूसातील कर्करोगाचे निदान करण्यासाठी होऊ शकतो, हे संशोधनाअंती स्पष्ट झाल्याचा दावा साहा यांनी केला आहे.

Back to top button