सुनीता केजरीवालांना हायकोर्टाचा धक्‍का, ‘तो’ व्‍हिडिओ हटविण्‍याचे आदेश | पुढारी

सुनीता केजरीवालांना हायकोर्टाचा धक्‍का, 'तो' व्‍हिडिओ हटविण्‍याचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍ली मद्‍य धोरण प्रकरणी अटकेत असलेले दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या पत्‍नी सुनीता केजरीवाल यांना दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने आज नोटीस बजावली आहे. अरविंद केजरीवाल हे उच्‍च न्‍यायालयात युक्‍तीवाद करत असतानाचा व्‍हिडिओ त्‍यांनी त्‍यांच्‍या X अकाउंटवर शेअर केला होता. या प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे. तसेच हा व्‍हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने काढून टाकावेत, असेही आदेश न्‍यायालयाने दिले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?

दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्‍ली मद्‍य धोरण प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली. ही कारवाई बेकायदेशीर आहे, असा दावा करणारी याचिका केजरीवाल यांनी उच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. २८ मार्च रोजी करण्‍यात आलेल्‍या युक्‍तीवादाचा व्‍हिडिओ सुनीता केजरीवाल यांनी आपल्‍या X अकाउंटवर शेअर केला होता. याविरोधात वकिल वैभव सिंग यांनी दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी दिल्ली उच्च न्यायालय नियम 2021″ अंतर्गत न्यायालयीन कामकाजाचे रेकॉर्डिंग प्रतिबंधित आहे, हे व्हिडिओ व्हायरल करणे हा न्यायपालिका आणि न्यायाधीशांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होता. व्हिडिओ पोस्ट करणे हा अरविंद केजरीवाल आणि आपच्या कटाचा एक भाग आहे, असाही दावा या याचिकेतून करण्‍यात आला होता.

काय म्‍हणाले उच्‍च न्‍यायालय?

आजच्‍या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाच्‍या न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि अमित शर्मा यांच्या खंडपीठाने सुनीता केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांनी न्‍यायालयात केलेल्‍या युक्‍तीवादाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून टाकण्यास सांगितले. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबनेही हा व्‍हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

Back to top button