चारशे जागा जिंकल्या तरी आरक्षण हटविणार नाही; अमित शहा यांची ग्वाही | पुढारी

चारशे जागा जिंकल्या तरी आरक्षण हटविणार नाही; अमित शहा यांची ग्वाही

नवी दिल्ली/ हैदराबाद; वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे समाजातील मागास घटकांसाठीचे आरक्षण भाजपला संपवायचेच असते तर भाजपने कधीच तसे केले असते. पण तसे भाजपला पुढेही करायचेच नाही. उलट ‘400 पार’चे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर राज्यघटना व आरक्षण अधिक मजबूत होणार आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण न देण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूलभूत तत्त्वच तुष्टीकरणाचे धोरण डोळ्यासमोर ठेवून उलथवून टाकण्याचा काँग्रेसचाच डाव आहे, असा पलटवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केला.

मागास घटकांच्या हक्कांत कपात करून धार्मिक आधारावर आरक्षण देण्याचा कट काँग्रेसने रचलेला आहे. मात्र भाजप आहे, तोवर हा कट कधीही यशस्वी होणार नाही, हे काँग्रेसला माहिती आहे. त्यामुळेच या पक्षाचे नेते राहुल गांधी हे, भाजप आरक्षण रद्द करू इच्छिते, भाजपला राज्यघटनाच रद्दबातल ठरवायची आहे, अशी देशातील मागास समाजाची दिशाभूल करत असतात, असे शहा म्हणाले.
तिसर्‍यांदा भाजपला केंद्रात बहुमत मिळाले तर भाजप मागासवर्गीयांचे आरक्षण संपुष्टात आणेल, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर एनआयए या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया देताना अमित शहा पुढे म्हणाले, उलट भारतीय समाजातील मागासवर्गीयांची सर्वांगीण प्रगती, हेच भाजपचे मुख्य ध्येय आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए जोवर सत्तेत आहे, तोवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातील आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणावर कुठलाही पुनर्विचार होणार नाही, असे आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट केलेले आहे, असे शहा यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांनी खोटे बोलणे, अफवा पसरविणे थांबवावे, असे आवाहनही शहा यांनी केले. दहा वर्षे झाले आम्ही सत्तेत आहोत. दोन्ही सभागृहांत बहुमतही आम्हाला होते. आरक्षण संपवावे, असे चुकूनही आमच्या डोक्यात येणार नाही. कारण आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत. काँग्रेसनेच उलट आरक्षणाविरोधात कृतिशील मोहीम चालविलेली आहे. कर्नाटकमध्ये सत्ता प्राप्त झाल्यानंतर मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण या पक्षाने दिले. मुळात धर्माच्या आधारावर आरक्षण घटनाकारांना मान्य नाही. याउपर कुणाच्या कोट्यातून हे आरक्षण मुस्लिमांना देण्यात आले, ही बाब काही जनतेपासून लपून राहिलेली नाही. मागासवर्गीयांच्या आरक्षणात कपात झाली. आज जामिया मिलिया इस्लामिया आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठांतूनही एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे, असेही शहा यांनी निदर्शनास आणून दिले.

रा. स्व. संघाचा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा : मोहन भागवत

समाजातील विशिष्ट घटकांना दिलेल्या आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही विरोध केला नाही, असे हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी स्पष्ट केले. आरक्षणाची गरज आहे तोपर्यंत ते सुरूच राहावे, असे संघाचे मत आहे. समाजात संपूर्ण समरसता आली, की ते आपोआपच संपेल. आरएसएस आरक्षणाच्या विरोधात आहे, असा व्हिडीओ माझ्या आगमनानंतर हैदराबादेत व्हायरल केला जात होता.

आम्ही आत वेगळे बोलतो आणि बाहेर वेगळे बोलतो, असेही बरळले जात होते. संघाने अगदी सुरुवातीपासूनच संविधानाने दिलेल्या सर्व आरक्षणांना पाठिंबा दिलेला आहे. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे. समाजात भेदभाव दिसत नसला तरी असतो. दिसत नसलेला भेदभावही संपेल तेव्हा आरक्षणही आपोआप संपेल, असे संरसंघचालक यापूर्वीही म्हणाले होते, हे येथे उल्लेखनीय!

Back to top button