ममता बॅनर्जींवर कारवाई करा, भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी | पुढारी

ममता बॅनर्जींवर कारवाई करा, भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपने पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. विविध ठिकाणी प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी चुकीचे आणि आक्षेपार्ह शब्द वापरले असून निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.२२) संध्याकाळी दिल्लीतील निवडणूक आयोग कार्यालयात निवडणूक आयुक्तांची भेट घेत मागणीचे निवेदन सादर केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस हा संघर्ष सुरू आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने ममता बॅनर्जी यांच्या काही भाषणांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली. यामध्ये त्यांनी मुर्शिदाबाद मध्ये केलेले भाषण तसेच मेडिनीपूरमधील भाषण आणि जलपाईगुडीमधील भाषणांचा समावेश आहे. तसेच काही लोकांवर जाणीवपूर्वक हल्ले करण्यात आल्याचेही भाजपने म्हटले आहे. ममता बॅनर्जी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करतात, अशा आशयाचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे देत कारवाईची मागणी केली.

“मुर्शिदाबाद आणि मेडिनीपुरमध्ये हिंदू लोकांवर हल्ला करण्यात आला. रामनवमीची शोभायात्रा थांबवण्यात आली, भाजपाच्या कार्यकर्त्यांना धमकावण्यात आले. जलपाईगुडीमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चिडण्याची भाषा केली,” असेही या निवेदनात भाजपने म्हटले आहे. या संदर्भातील पुरावे देखील भाजपने सोबत जोडले आहेत. हिंदू समुदायावर झालेले हल्ले आणि ममता बॅनर्जी यांनी केलेले प्रक्षोभक वक्तव्य या गोष्टी लक्षात घेता हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली. भाजपच्या शिष्टमंडळामध्ये भाजप नेते तरुण चूघ, अनिल बलुनी, ओम पाठक यांचा समावेश होता.

हेही वाचा : 

Back to top button