नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राजकीय नेत्यांच्या नामसाधर्म्यामुळे आम्ही राहुल गांधी अथवा लालूप्रसाद यादव नामक अन्य उमेदवारांना निवडणूक लढविण्यापासून रोखू शकत नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
नामसाधर्म्यामुळे संबंधित उमेदवारांना निवडणूक लढविण्यापासून मज्जाव करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने निवडणूक आयोगाला त्याबाबत योग्य ते निर्देश देण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले की, एखाद्या उमेदवाराचे अथवा व्यक्तीचे नाव अन्य राजकीय नेत्यांसारखे असल्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखता येणार नाही. एखाद्या व्यक्तीचे जन्मजात नाव राहुल गांधी अथवा लालूप्रसाद यादव असल्यास त्यांना निवडणूक लढविण्यापासून कसे रोखता येईल, त्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखल्यास त्यांच्या हक्कावर गदा येणार नाही का, राजकीय नेत्यांसारखे एखाद्यास त्यांच्या जन्मदात्यांनी नाव दिले असल्यास त्यास निवडणूक लढविण्यापासून रोखायचे का, अशी प्रश्नांची सरबत्ती करीत न्यायालयाने नामसाधर्म्याविरोधातील याचिका मागे घेण्याचा सल्ला याचिकाकर्त्यास दिला. अशा याचिकांचे भवितव्य काय असू शकते, अशी विचारणाही न्यायालयाने यावेळी केली.
हेही वाचा :