Lok Sabha Election 2024 : भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस आक्रमक; शरद पवारांना देणार झटका | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस आक्रमक; शरद पवारांना देणार झटका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढली पाहिजे. देश स्वतंत्र झाल्यापासून भिवंडी लोकसभा काँग्रेस पक्ष लढत आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दावा चुकीचा आहे, असे स्पष्ट मत काँग्रेस नेते आणि भिवंडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीत काँग्रेसचा दावा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही या जागेवर दावा केला आहे.

राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक घडामोडी सुरू आहेत. पहिल्या टप्प्याच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मात्र अद्यापही राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटपाचे सूत्र ठरलेले नाही. अजूनही काही जागांसाठी दोन्ही ठिकाणी युती आणि आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. यातच महाविकास आघाडीत भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने लढला पाहिजे, यासाठी भिवंडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही या जागेवर दावा केला आहे.

दयानंद चोरघे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “भिवंडी लोकसभा मतदारसंघ देश स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेस पक्ष लढत आहे. जवळपास नऊ वेळा काँग्रेस पक्षाचे खासदार भिवंडीतून निवडून गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दावा भिवंडी लोकसभेवर चुकीचा आहे,’’ असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला थेट प्रत्युत्तर दिले. सोबतच “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात ही वरिष्ठ मंडळी जे आदेश देतील त्याचे पालन करणार” असेही ते म्हणाले. मात्र यानिमित्ताने महाविकास आघाडीतील जागावाटप अद्यापही स्पष्ट नसल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा :

Back to top button