Bihar Lok Sabha Election: इंडिया आघाडीचे बिहारमधील जागावाटपाचे सूत्र ठरले!, राजद २६ तर काँग्रेस ९ जागांवर लढणार | पुढारी

Bihar Lok Sabha Election: इंडिया आघाडीचे बिहारमधील जागावाटपाचे सूत्र ठरले!, राजद २६ तर काँग्रेस ९ जागांवर लढणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे बिहारमधील जागावाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. ४० लोकसभा क्षेत्र असलेल्या बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल २६ जागा तर काँग्रेस ९ जागांवर लढणार आहे. डाव्या पक्षांना पाच जागांवर लढणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एका दिवसानंतर आघाडीतील जागावाटपाची घोषणा करण्यात आली. पाटणा येथील राजद कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. (Bihar Lok Sabha Election)
पप्पू यादव यांचा पत्ता कट
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जागा वाटपाचे सूत्र ठरवण्यात आणि उमेदवार ठरवण्यात गुंतले आहेत. देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल नंतर बिहार सर्वात जास्त लोकसभा क्षेत्र असलेले राज्य आहे. या सर्व घडामोडी दरम्यान इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांनी जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब केले. ४० लोकसभा क्षेत्र असलेल्या बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल २६  तर काँग्रेस ९ जागांवर लढणार आहे. डाव्यांच्या पाच जागांपैकी कम्युनिस्ट पक्ष (एमएल) ३, कम्युनिस्ट पक्ष १ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष १ जागा लढवणार आहेत. बिहारच्या जागावाटपात सर्वात मोठी अडचण पूर्णियाच्या जागेवरून होती. ही जागा आता राजदकडे आली आहे. त्यामुळे पप्पू यादव यांचा पत्ता कट झाला आहे. (Bihar Lok Sabha Election)

यंदाही काँग्रेसला बिहारमध्ये ९ जागा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाने ४० पैकी ३९ जागांवर विजय मिळवला होता. केवळ एकच जागा काँग्रेसला मिळाली होती. त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाने १९ जागा लढवल्या होत्या आणि काँग्रेसने ९ जागा लढवल्या होत्या तर १२ जागा इतर मित्र पक्षांनी लढवल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीद्वारे राजद २६ जागा लढवणार आहे म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा सहा जागा अधिक लढवणार आहे. काँग्रेस मात्र गेल्या वेळ प्रमाणेच ९ जागा लढणार आहे. यावेळी ५ जागा डाव्या पक्षांना देण्यात आल्या आहेत. (Bihar Lok Sabha Election)

नितीश कुमार पुन्हा एकदा ‘NDA’ चा भाग

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. मात्र नंतर भाजपसोबत फारकत घेत राष्ट्रीय जनता दलासोबत युती करून सरकार स्थापन केले. इंडिया आघाडी तयार होण्यासाठी प्रयत्नही नितीश कुमार यांनीच केले मात्र काही दिवसांपूर्वीच नितीश कुमारांनी पुन्हा एकदा एनडीएचा भाग होणे पसंत केले. त्यांचा पक्ष आता पुन्हा एकदा एनडीएच्या माध्यमातून भाजपसोबत लोकसभा लढवणार आहेत.

सूत्र दिल्लीत ठरले, घोषणा पाटण्यात

दिल्लीत राजद आणि काँग्रेस नेत्यांमध्ये तीन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर बिहारमधील एनडीएचे सूत्र ठरले. आज पाटण्यातील राजद कार्यालयात राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह, राजद नेते अब्दुल बारी सिद्दीकी, श्याम रजक, उदय नारायण चौधरी आणि डाव्या पक्षांचे धीरेंद्र झा, राम नरेश पांडे पटना येथे उपस्थित होते.
हेही वाचा:

Back to top button