सात वर्षांपूर्वीच्या एअर इंडियामधील गैरव्यवहार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना दिलासा | पुढारी

सात वर्षांपूर्वीच्या एअर इंडियामधील गैरव्यवहार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना दिलासा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सीबीआयने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप असलेले एअर इंडियामधील गैरव्यवहार प्रकरण बंद केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयने प्रफुल्ल पटेल आणि तत्कालीन अधिकाऱ्यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना हा मोठा दिलासा आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत राहणे पसंत केले. पुढे अजित पवार गट राज्यात सत्तेत सहभागी झाला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मे २०१७ मध्ये सीबीआयने एअर इंडियासाठी विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी नागरी उड्डयन मंत्रालय आणि एअर इंडियाचे अनेक अधिकाऱ्यांचा तपास करण्यात आला होता. प्रफुल पटेल यांच्यामुळे सरकारचे ८४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला होता. सीबीआयने जवळपास सात वर्षे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हा तपास बंद केला.

यूपीए सरकारमधील तत्कालीन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळी सार्वजनिक वाहक असलेल्या एअर इंडियासाठी मोठ्या संख्येने विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. एअर इंडियासाठी विमान खरेदीचा कार्यक्रम सुरू असतानाही हे विमान भाडे तत्वावर देण्यात आल्याचा आरोपही सीबीआयने केला होता. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या विलीनीकरणानंतर नॅशनल एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची (एनएसीआयएल) स्थापना झाली.

पंतप्रधान मोदींनी माफी मागावी- काँग्रेस

प्रफुल पटेल यांना क्लीन चिट दिल्यानंतर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. “पटेल यांना क्लीन याचा अर्थ यूपीए-२ सरकारविरुद्ध भाजपने केलेले आरोप खोटे होते. त्यामुळे पंतप्रधानांनी आता डॉ. मनमोहन सिंग आणि देशाची माफी मागावी!” अशी खोचक प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली आहे.

Back to top button