Lok Sabha Election 2024 | पैसे, दारू वाटप रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचे आदेश | पुढारी

Lok Sabha Election 2024 | पैसे, दारू वाटप रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचे आदेश

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून ही निवडणूक पारदर्शी होण्यासाठी, तसेच नोट फॉर व्होटचा वापर रोखण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार बँकांना संपूर्ण निवडणूक काळात संशयास्पद व्यवहारांचा अहवाल (एसटीआर) दररोज सादर करावा लागणार आहे.

राजीव कुमार म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पैशाचा गैरवापर प्रभावीपणे रोखण्यासाठी आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी आम्ही काही पावले उचलेली आहेत. यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एखाद्या शाखेत पैशाची मागणी अचानक का वाढली, याबाबत बँका माहिती घेतील, तसेच वॉलेटद्वारे पेमेंटमध्ये अधिक मागणी असल्यास एनपीसीआय त्यावर लक्ष ठेवेल. वॉलेटद्वारे होणार्‍या सर्व व्यवहारांवर आमचे लक्ष असेल.

पैसे, दारू वाटप रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचे आदेश

निवडणुकीदरम्यान पैशाच्या गैरवापरावर रोखण्यासाठी एनपीसीआय, जीएसटी, बँका यांसारख्या सशक्त संस्था संशयास्पद व्यवहारांचा नियमित मागोवा घेतील. निवडणूक काळातील पैसे आणि दारू वाटप, मोफत वस्तू वितरण रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचे आदेश देण्यात आले आहेत. संवेदनशील आणि मोफत वस्तूंचे बेकायदेशीर वितरण, याबरोबरच बेकायदा ऑनलाईन, रोख हस्तांतरावर कडक नजर ठेवली जाईल. या माध्यमातून निवडणूक काळात पैशाच्या गैरवापरला चाप बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button