नव्या सरकारसोबत संसदेचे रुपडेही पालटणार, शिवाजी महाराज, म. गांधींसह सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे होणार स्थलांतर | पुढारी

नव्या सरकारसोबत संसदेचे रुपडेही पालटणार, शिवाजी महाराज, म. गांधींसह सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे होणार स्थलांतर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीनंतर नव्या सरकारतर्फे बोलावल्या जाणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान संसद भवन संकुलाचे संपूर्ण रूप बदललेले दिसेल. जुने संसद भवन, नवीन संसद, ग्रंथालय आणि विस्तारीत भवन यांच्यात एकजिनसीपणा आणण्यासाठी आणि संसदेची भव्यता वाढविण्यासाठी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यासह सर्व महापुरुषांचे सर्व पुतळे एकाच ठिकाणी ठेवण्याची योजना असल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनाभोवती वाहनांची ये – जा सुलभ करण्यासाठी आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची गरज लक्षात घेऊन संसद परिसरातील संकुलामध्ये बदल करण्यात येत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरक्षा भंगाच्या घटनेनंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमधील सुरक्षा वाढविण्याबरोबरच संसद संकुलात अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची गरज लक्षात घेऊन अनेक पावले उचलली जात आहेत, त्याअंतर्गत हा प्रस्ताव समोर आला असून त्यासाठीची तयारीही सुरू झाल्याचे समजते.

सद्यस्थितीत संसद संकुलामध्ये जुने संसद भवन, नवे संसद भवन, संसदीय ग्रंथालयाची इमारत आणि विस्तारीत इमारत अशा चार भव्य इमारती आहेत. मात्र, आतमधील रस्ते, कुंपणाच्या भिंती यामुळे या इमारतींमध्ये जाण्यात येत असलेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर बदलाची गरज व्यक्त केली जात होती. या बदलांमध्ये अनावश्यक भिंती हटविणे, संकुलात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले महापरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी आणण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते. यात संसद संकुलामध्ये खासदारांसाठी पूर्णपणे बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर देखील बंधकारक केला जाणार असल्याचे कळते.

सद्यस्थितीत जुन्या संसद भवनात मध्यवर्ती कक्षाच्या बाहेर आणि दोन्ही सभागृहांच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले सर्व पुतळे जैसे थे राहतील. केवळ बाहेरच्या परिसरात असलेले महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महाराणा प्रताप, बिरसा मुंडा यांच्यासह अन्य महापुरुषांचे पुतळे सध्याच्या स्थानावरून हटवून विद्यमान संविधान भवनाच्या प्रवेशद्वार क्रमांक पाच जवळ एकत्रितपणे ठेवण्यात येतील. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा विस्तारीत इमात आणि ग्रंथालय इमारतीच्या मधोमध असून तो देखील अशा पद्धतीने स्थलांतरीत केला जाईल, जेणे करून आंबेडकर जयंतीला संसदेच्या संकुलात प्रवेश करताना लोकांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्ष असो, सर्वांच्या आंदोलनांचे स्थळ असलेला आणि संसदेची ओळख बनलेला महात्मा गांधींचा पुतळा १९९३ मध्ये जुन्या संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर (प्रवेशद्वार क्रमांक १) बसविण्यात आला होता. नवे संसद भवन बांधकाम सुरू झाल्यानंतर हा पुतळा प्रवेशद्वार क्रमांक दोन समोर स्थलांतरीत करण्यात आला होता. तर, शिवाजी महाराजांचा अश्वारुढ भव्य पुतळा शिवसेना नेते मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष असताना लोकसभाध्यक्षांच्या प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आला होता. तर त्याच शेजारी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांचाही पुतळा आहे. संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा संसद परिसरात १९६७ साली बसवण्यात आला होता.

Back to top button