रामलल्लाचरणी पहिल्याच दिवशी पाच लाख भाविक | पुढारी

रामलल्लाचरणी पहिल्याच दिवशी पाच लाख भाविक

अयोध्या, वृत्तसंस्था : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसर्‍या दिवशीपासून म्हणजे मंगळवारपासून श्रीराम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले होताच दर्शनासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली. पहाटे तीनपासून रांगा लावत भक्तांनी दर्शन घेतले. दिवसभरात पाच लाख भाविकांनी श्री रामलल्लाचे दर्शन घेतले.

सोमवारी श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. सोमवारी निमंत्रितांनाच दर्शन मिळू शकले; पण मंगळवारपासून सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले झाले. गेल्या तीन दिवसांपासूनच अयोध्येत हजारो भाविक दाखल झाले होते. त्यात सोमवारचा सोहळा संपल्यानंतर आणखी भाविकांची गर्दी झाली. मंदिर सकाळी सात वाजता उघडणार असले, तरी पहाटे तीनपासूनच भाविकांनी रांगा लावल्या. मुख्य मंदिर संकुलाबाहेर लांबच लांब रांगा वाढत गेल्या. रामलल्लाच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या भाविकांना कधी एकदा डोळे भरून रामलल्लाचे अद्वितीय रूप डोळ्यांत साठवतो, असे झाले होते. सात वाजता मंदिर उघडले आणि भाविकांचे जथ्थे आत शिरू लागले.

लाठीमाराचे प्रकार

इकडे मागे रांगा वाढतच होत्या. जागोजागी सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिसांचे कडे तोडून रेटारेटी करत पुढे सरकण्याचे प्रकारही उत्साही भाविकांकडून झाले. या सर्व भाविकांना आवरता आवरता पोलिस यंत्रणांना नाकी नऊ येत होते. रांगेत काही ठिकाणी पोलिसांना या भाविकांना आवरण्यासाठी हलका लाठीमार करावा लागला.

अयोध्येत इंचभरही जागा नाही

भाविकांच्या गर्दीने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड मोडले असून, अयोध्येत पाय ठेवायलाही जागा राहिली नाही. सारे पार्किंग लॉट फुल्ल झाले असून, अखेर अयोध्येबाहेर काही कि.मी. अंतरावर वाहने लावून भाविकांना रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत यावे लागत आहे. अयोध्येत जेथे जाल तेथे रामनामाचा जयघोष करणार्‍या भाविकांशिवाय दुसरे कोणतेही चित्र दिसत नाही, अशी स्थिती आहे. शरयूचे घाटही भाविकांच्या गर्दीने गच्च भरले असून, शहरातील दुकाने, हॉटेलांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

बाराबंकीतच भाविकांना रोखले

अयोध्येत पाय ठेवायला जागा नसतानाही अयोध्येकडे जाणार्‍या भाविकांच्या गर्दीने रस्ते तुडुंब भरले आहेत. लखनौपासून 30 कि.मी.वर असलेल्या बाराबंकीमध्ये तर एवढी गर्दी झाली की, तेथील पोलिसांना अयोध्येला जाणार्‍या भाविकांना रोखण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अयोध्येला पायी निघालेल्या भाविकांनाही रोखण्यात आले. दुपारनंतर भाविकांना तुकड्या तुकड्यांनी सोडण्यात आले.

Back to top button