Polycab India ला तगडा झटका! एका कारवाईने शेअर्स धडाम, २० टक्क्यांची घसरण | पुढारी

Polycab India ला तगडा झटका! एका कारवाईने शेअर्स धडाम, २० टक्क्यांची घसरण

पुढारी ऑनलाईन : आयकर विभागाने अलीकडेच पॉलीकॅब समूहावर छापे टाकल्यानंतर सुमारे १ हजार कोटी रुपयांची “बेहिशेबी रोख विक्री” आढळून आली. यामुळे विद्युत उपकरणे उत्पादक पॉलीकॅबचे शेअर्स (Polycab India) आज गुरुवारच्या व्यवहारात धडाधड कोसळले. हे शेअर्स आज २० टक्क्यांनी घसरून ३,९०२ रुपयांच्या दिवसाच्या निचांकी पातळीवर आले. पॉलीकॅबचे शेअर्स एका दिवसात १ हजार रुपयांनी कमी झाला आहे. (Polycab India Share Price)

 संबंधित बातम्या 

पीटीआयच्या वृत्तानुसार, “गेल्या वर्षी २२ डिसेंबर रोजी या समुहाची झाडाझडती सुरू झाल्यानंतर ४ कोटींहून अधिक रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली होती आणि २५ हून अधिक बँक लॉकर्सवर निर्बंध ठेवण्यात आले होते,” असे केंद्रीय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एका निवेदनात म्हटले आहे.

यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक, गुजरातमधील दमण, हलोल आणि दिल्ली येथील एकूण ५० ठिकाणांचा समावेश होता.

सीबीडीटीने सांगितले की या छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात गुन्ह्यांशी संबंधित पुरावे जप्त करण्यात आले होते. यावरून काही अधिकृत वितरकांच्या संगनमताने पॉलीकॅब समूहाने अवलंबलेली “कर चुकवेगिरीची मोडस ऑपरेंडी” उघड झाली, असे त्यात म्हटले आहे.

“झाडाझडतीदरम्यान मिळालेल्या विश्वासार्ह पुराव्यांवरून हे सिद्ध झाले आहे की पॉलीकॅब कंपनीने सुमारे १ हजार कोटी रुपयांची बेहिशेबी रोख विक्री केली आहे ज्याची हिशोबाच्या पुस्तकात नोंद नाही,” असा CBDT ने दावा केला.

दरम्यान, पॉलीकॅब इंडियाने मात्र स्टॉक एक्स्चेंजकडे केलेल्या खुलाश्यात “कंपनीने करचुकवेगिरी केल्याच्या” वृत्तांना “अफवा” म्हटले आहे.

“पोलीकॅब इंडिया कंपनीने करचुकवेगिरीचा आरोप फेटाळून लावला आहे.” कंपनीने फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, ”कंपनीने अनुपालन आणि पारदर्शकतेसाठी वचनबद्धतेवर भर दिला आहे आणि डिसेंबर २०२३ मधील झाडाझडती कारवाईदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले. दरम्यान, झाडाझडतीदरम्यान नेमके काय मिळाले याबाबत कंपनीला आयकर विभागाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.”

१९६४ मध्ये सिंध इलेक्ट्रिक स्टोअर्स म्हणून सुरू झालेल्या कंपनीचा १९९६ मध्ये पॉलीकॅब वायर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नंतर १९९८ मध्ये पॉलीकॅब इंडस्ट्रीज म्हणून समाविष्ट करण्यात आला. २०१८ मध्ये कंपनीने आपले नाव बदलून पॉलीकॅब इंडिया केले. (Polycab India)

Back to top button