Vibrant Gujarat Summit 2024 | गुजरातमध्ये २ लाख कोटींची गुंतवणूक, १ लाख नोकऱ्यांची निर्मिती, अदानींची घोषणा | पुढारी

Vibrant Gujarat Summit 2024 | गुजरातमध्ये २ लाख कोटींची गुंतवणूक, १ लाख नोकऱ्यांची निर्मिती, अदानींची घोषणा

पुढारी ऑनलाईन : गुजरातमध्ये पुढील ५ वर्षांत हरित ऊर्जा आणि अपारंपारिक क्षेत्रात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना अदानी समूहाने बुधवारी जाहीर केली. व्हायब्रंट गुजरात समिट २०२४ मध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Adani Group chairperson Gautam Adani) यांनी ही घोषणा केली. गौतम अदानी यांनी सूचित केले की या गुंतवणुकीतून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे १ लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. (Vibrant Gujarat Summit 2024)

गौतम अदानी यांनी व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये बोलताना महत्त्वाकांक्षी गुंतवणूक धोरणाची रूपरेषा सांगितली. “आम्ही आत्मनिर्भर भारतासाठी हरित पुरवठा साखळीचा विस्तार करत आहोत आणि सर्वात मोठी एकात्मिक, अपारंपारिक ऊर्जा परिसंस्था निर्माण करत आहोत. त्यालाठी पुढील ५ वर्षांमध्ये अदानी समूह गुजरातमध्ये सुमारे २ लाख कोटींची गुंतवणूक करेल,” गौतम अदानी म्हणाले.

गुजरातसाठी अदानी समूहाच्या गुंतवणूक योजनेची रूपरेषा सांगण्याबरोबरच अदानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने साधलेली उत्कृष्ट आर्थिक प्रगती अधोरेखित केली.

त्यांनी बोलताना २०१४ पासून भारताची मजबूत जीडीपी वाढ आणि दरडोई उत्पन्नाचा उल्लेख केला. “सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे” असे त्यांनी पुढे म्हटले. “आजचा भारत उद्याच्या जागतिक भविष्याला आकार देण्यासाठी तयार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

व्हायब्रंट गुजरात समिटबद्दल बोलताना, अदानी म्हणाले, “व्हायब्रंट गुजरात हे पीएम मोदींच्या असामान्य दूरदृष्टीचे अद्भुत प्रकटीकरण आहे. यात तुमच्या भव्य महत्त्वाकांक्षा, सूक्ष्म प्रशासन आणि त्रुटीरहित अंमलबजावणी आहे. आपली सर्व राज्ये भारताच्या औद्योगिक परिदृश्याची मूलभूत पुनर्रचना करण्यासाठी स्पर्धा आणि सहकार्य करत पुढे जात आहेत.” (Vibrant Gujarat Summit 2024)

हे ही वाचा :

 

Back to top button