Giriraj Singh On Nitish Kumar : लालूप्रसाद ‘जेडीयू’ आमदारांच्या संपर्कात; नितीशकुमार सरकार कोसळणार : गिरीराज सिंह यांचा मोठा दावा | पुढारी

Giriraj Singh On Nitish Kumar : लालूप्रसाद 'जेडीयू' आमदारांच्या संपर्कात; नितीशकुमार सरकार कोसळणार : गिरीराज सिंह यांचा मोठा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात तापू लागले आहे. जनता दल संयुक्‍त (जेडीयू) मधील फेरबदलानंतर भाजपने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सातत्याने हल्लाबोल सुरू केला आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव हे जेडीयू आमदारांच्या संपर्कात असून, नितीश कुमार यांचे सरकार कधीही काेसळू शकते, असा मोठा दावा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केला आहे. Giriraj Singh On Nitish Kumar

गिरीराज सिंह म्हणाले की, नितीश कुमार यांच्या सरकारची परिस्थिती २०१७ सारखी झाली आहे. नितीशकुमार यांनी लल्‍लन सिंह यांना हटवून आपली नौका बुडण्यापासून वाचवली; परंतु ते लालूप्रसाद यादव यांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. लालूप्रसाद यादव आपल्या आमदारांच्या संपर्कात असून सरकार कधीही पडू शकते. तेजस्वी यादव मुख्यमंत्री होऊ शकतात, आता त्यांना कोणीही रोखू शकत नाही. नितीशकुमारांना दुसरा पर्याय नाही, पीएम मटेरियल सोडा, ते आता सीएम मटेरियलही राहिलेले नाही, अशी टीकाही गिरीराजसिंह यांनी केली. Giriraj Singh On Nitish Kumar

याआधी शुक्रवार लल्‍लन सिंह यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर नितीश यांच्यावर हल्लाबोल करताना गिरीराज सिंह म्हणाले होते की, ‘यात मोठी गोष्ट काय आहे? नितीश कुमार यांनी आधीच पक्षाध्यक्षांना बडतर्फ केले आहे. नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे बंद आहेत. ते आणखी काही दिवस बिहारचे मुख्यमंत्री राहणार हे निश्चित आहे. आता त्यांच्याकडे एकच पर्याय आहे ताे म्‍हणजे  लालूप्रसाद यादव यांना शरण जा आणि तेजस्वी यादव यांना नवीन मुख्यमंत्री होऊ द्या. दुसरीकडे पक्षांमध्ये फूट पाडून स्वतःचे सरकार बनवण्यात लालू यादव माहिर आहेत, असा टाेलाही  त्‍यांनी लगावला.

हेही वाचा 

Back to top button