Breaking News : महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला दुबईत अटक | पुढारी

Breaking News : महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला दुबईत अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपच्या प्रमुख मालकांपैकी एक असलेल्या रवी उप्पलला ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने जारी केलेल्या रेड नोटीसच्या आधारे स्थानिक पोलिसांनी दुबईत ताब्यात घेतले आहे. अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी (दि.१३) दिली. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी त्याला भारतात पाठवण्यासाठी दुबई अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. (Mahadev Betting App)

माहितीनुसार, बेकायदेशीर सट्टेबाजी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी रवी उप्पल याला दुबईत ताब्यात घेण्यात आले आहे. रवी उप्पल महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपच्या दोन मुख्य मालकांपैकी एक आहेत. ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने रवीविरोधात रेड नोटीस जारी केली होती. त्या आधारे दुबई पोलिसांनी रवीला ताब्यात घेतले आहे.  ईडी व्यतिरिक्त छत्तीसगड पोलीस तसेच मुंबई पोलीस देखील उप्पल विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करत आहेत. कथित बेकायदेशीर सट्टेबाजीशी संबंधित या मनी लाँडरिंग प्रकरणात, ईडीने ऑक्टोबरमध्ये छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला होता. उप्पल आणि दुसरे महादेव अॅप प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

नंतर ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलने रेड नोटीस जारी केली. ईडीने आरोपपत्रात न्यायालयाला सांगितले होते की, उप्पलने पॅसिफिक महासागरातील वानुआतु या बेट देशाचा पासपोर्ट घेतला होता. मात्र, त्यांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडलेले नाही. ईडीच्या म्हणण्यानुसार उप्पलचे उत्पन्न गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. यासोबतच कोट्यवधी रुपये लपवण्यातही त्याचा हात आहे.

Mahadev Betting App : काय आहे प्रकरण…

केंद्र सरकारने ऑनलाइन बेटिंग ॲपबाबत (Mahadev Betting App) मोठा निर्णय घेतला होता. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने महादेव बुक आणि रेड्डीअण्णा प्रेस्टोप्रोसह २२ बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश दि. ५ नोव्हेंबर रोजी देण्यात आले होते. बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप सिंडिकेट आणि त्यानंतर छत्तीसगडमधील महादेव बुक ॲपवर टाकलेल्या छाप्यामध्ये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या तपासानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते. या कारवाईनंतर ॲपचे बेकायदेशीर प्रकरण उघडकीस आले आहे.

हेही वाचा

Back to top button