Maldivian government action : PM मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी, मालदीवचे तीनही मंत्री निलंबित | पुढारी

Maldivian government action : PM मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी, मालदीवचे तीनही मंत्री निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे मालदीवच्या मंत्र्यांना महागात पडले आहे. मालदीव सरकारने त्यांच्या दोन मंत्र्यांवर कारवाई केली आहे. मरियम शिउना यांना निलंबित केले आहे. याशिवाय मलशा आणि हसन जिहान या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनीही मंत्री आणि खासदारांवर टीका केली होती. ते म्हणाले की, सोशल मीडियावर मालदीव सरकारच्या मंत्र्यांकडून भारताविरोधात वापरण्यात येत असलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा मी निषेध करतो. भारत हा मालदीवचा नेहमीच चांगला मित्र आहे आणि आम्ही अशा कठोर टिप्पण्यांमुळे आमच्या दोन्ही देशांमधील जुन्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरुन मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. यानंतर पीएम मोदींनी देशवासियांना देखील लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. यानंतर मालदीवमधील मंत्री आणि नेत्यांनी पीएम मोदींवर टीका करण्यास सुरूवात केली.  प्रकरणाबाबत मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देशांचे युजर्स आपसात भिडले आहेत. त्यानंतर आता मालदीव सरकारकडून मंत्र्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. (PM Modi Lakshadweep Visit)

Back to top button