Shiv Sena MLAs disqualification : आमदार अपात्रतेचा फैसला उद्या दुपारी | पुढारी

Shiv Sena MLAs disqualification : आमदार अपात्रतेचा फैसला उद्या दुपारी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या अपात्रतेचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी १० जानेवारी रोजी देणार असून, हा निकाल काय असेल याबद्दल प्रचंड राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी १४ सप्टेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत अपात्रता याचिकांवरील सुनावणी घेतली. या सर्व याचिकांचा निकाल बुधवारी दिला जाणार आहे. या अपात्रतेच्या निवाड्यातच शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, या झगड्याचा फैसलाही दडलेला असेल. शिवसेना फुटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मोठी कायदेशीर लढाई झाली.

शिंदे गटाने स्वतःला वेगळा गट न म्हणता आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार बंडखोर अथवा पक्षातून फुटलेल्या आमदारांना थेट अपात्र ठरविण्याच्या मुद्यावर कायदेशीर पेच निर्माण झाला. त्यावर, सर्वोच्च न्यायालयात जवळपास दहा महिने खल झाला. अखेर, दहाव्या सूचीनुसार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. मात्र, १४ मे २०२२ च्या या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांनी जवळपास पाचच महिन्यांनी कामकाज सुरु केले, त्यासाठीही सर्वोच्च न्यायालयाला ताशेरे ओढावे लागले होते.

शिवसेनेचे ४० आमदार फोडून एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करत ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेले दीड वर्ष त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली असून या दीड वर्षात त्यांच्या नेतृत्वात फुटलेला शिवसेनेचा गट स्थिरावला आहे. शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ पक्ष ठरवून पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दिले आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे जशी शिंदे गटाच्या ४० आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे तशी ती ठाकरे गटाच्या १४ आमदारांवरही आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांना वगळून ठाकरे गटाच्या उर्वरित आमदारांना अपात्र करण्याची याचिका शिंदे गटाने केली आहे. शिंदे गट पात्र ठरला तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र ठरविणारा निर्णयही येऊ शकतो. निर्णय विरोधात जाण्याची शक्यता गृहीत धरून उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करून ठेवली आहे. तशीच तयारी शिंदे गटाची आहे. त्यामुळे काहीही निर्णय आला तरी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

तलवार दोन्हीकडे टांगलेली

दुसरीकडे जशी शिंदे गटाच्या ४० आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे तशी ती ठाकरे गटाच्या १४ आमदारांवरही आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांना वगळून ठाकरे गटाच्या उर्वरित आमदारांना अपात्र करण्याची याचिका शिंदे गटाने केली आहे. शिंदे गट पात्र ठरला तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र ठरविणारा निर्णयही येऊ शकतो. निर्णय विरोधात जाण्याची शक्यता गृहीत धरून उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करून ठेवली आहे. तशीच तयारी शिंदे गटाची आहे. त्यामुळे काहीही निर्णय आला तरी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

शिंदे मात्र पदावर ठाम

विधानसभा अध्यक्षांचा निकाल शिंदेंच्या विरोधात जाणार असे तर्क लावले जात असताना स्वतः शिंदेंनी मात्र अजून आठ महिने मीच मुख्यमंत्री राहणार असे सांगून हा निकाल अपल्या बाजूने लागेल असे संकेत दिले आहेत. हा निकाल १० तारखेला येणार असताना १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा ठरला असून ते शिवडी- नाव्हा शेवा सागरी सेतूसह महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असून स्वतः मुख्यमंत्री त्यावर जातीने लक्ष ठेऊन आहेत. हा निकाल विरोधात जाण्याची शक्यता असती तर राज्य सरकारने १२ तारखेचा मुहूर्त निवडलाच नसता असे शिंदे गटातून सांगितले जात आहे.

हा असेल निकालाचा आधार

  • राज्यातील सत्तांतराच्या वेळी नेमका पक्ष कुणाचा होता, याचा निर्णयही विधानसभा अध्यक्षांना करायचा आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष कोणते निकष ठरवितात, यावर निकाल कुणाच्या बाजूने वळणार हे ठरणार आहे.
  • पक्ष कुणाचा हे एकदा निश्चित केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवड आणि विश्वासदर्शक ठरावावेळी बजावण्यात आलेला व्हीप आणि मतदानासाठी कोणाचा पक्षादेश खरा मानायचा याचा निर्णय देतील.
  • ज्या गटाचा पक्ष मानला जाईल त्याच गटाचे आमदार अपात्रेच्या कारवाईपासून वाचतील, असे मानले जात आहे.

लक्ष निकालाकडे

  • ४:०० वाजता दुपारी नार्वेकर निकालाचे वाचन सुरू करतील असे समजते. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही कार्यवाही चालेल.
  • १२०० पानांचे हे निकालपत्र असल्याचे समजते.
  • ०६ गटात सर्व याचिकांची वर्गवारी करण्यात आली होती. या पाच गटांतील निकालाचे महत्वाचे मुद्दे विधानसभा अध्यक्ष वाचून दाखवतील. सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर पाठविली जाणार असल्याचे समजते.

Back to top button