NITI Aayog : निती आयोगाच्या वतीने परिवर्तनशील तंत्रज्ञानावर कार्यशाळेचे आयोजन | पुढारी

NITI Aayog : निती आयोगाच्या वतीने परिवर्तनशील तंत्रज्ञानावर कार्यशाळेचे आयोजन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जी-२० परिषदेने स्विकारलेल्या संयुक्त जाहीरनाम्याच्या आधारे निती आयोगाच्या वतीने परिवर्तनशील तंत्रज्ञानावर उद्या (५ नोव्हेंबर) दिल्लीत विशेष कार्यशाळा होणार आहे. यामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विकास आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन यावर प्रामुख्याने चर्चा होईल.

या कार्यशाळेत परिवर्तनशील तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक आणि या क्षेत्रातील सर्व स्तरातील प्रतिनिधी सहभागी होतील. सदर कार्यशाळा चार सत्रांमध्ये विभागली आहे. लोकांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल ओळख, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणे, माहितीच्या दृष्टीने मजबूत होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तसेच या क्षेत्रात आणखी नव्या संधी शोधणे असे चार भाग या कार्यशाळेत असतील. ही कार्यशाळा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना लागू असलेल्या कायदेशीर गोष्टी लक्षात घेत डिजिटल अर्थव्यवस्था बळकट करण्याची आणि रोडमॅप ठरवण्याची एक संधी असेल.

१ नोव्हेंबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ कालावधी दरम्यान अशा दहा कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये जी-२० ते जी-२१, विकासासाठी माहीतीचा वापर, पर्यटन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, शाश्वत विकासाची उद्दिष्टे, व्यापार, भारतीय विकास मॉडेल, महिलांद्वारे केलेला विकास, नेतृत्व विकास, बँकांचा बहुपक्षीय विकास आणि सुधारणा, पर्यावरण संवर्धनासाठी वित्त पुरवठा, हरित विकास या विषयांचा समावेश आहे.

Back to top button