Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला, बेअर अटॅकचे कारण काय? | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला, बेअर अटॅकचे कारण काय?

पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज गुरुवारी (दि.२६) शेअर बाजार सलग सहाव्या सत्रांत गडगडला. आज सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरून ६३,१४८ वर बंद झाला. तर निफ्टी २६४ अंकांनी घसरून १८,८५७ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांची आजची घसरण ही प्रत्येकी १ टक्क्यांहून अधिक राहिली. दोन्ही निर्देशांकांची २८ जूननंतरची पहिली मोठी घसरण आहे. यूएस ट्रेझरी उत्पन्न आणि मध्य पूर्व संघर्ष हे घटक बाजारातील घसरणीला प्रमुख कारण ठरले.

आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे ५.७८ लाख कोटींनी कमी होऊन ते ३०३.४४ लाख कोटींवर आले आहे. एकूणच ऑक्टोबरचा सणासुदीचा महिना गुंतवणूकदारांसाठी तोट्याचा ठरला आहे. कारण या महिन्यांत आतापर्यंत सेन्सेक्सने सुमारे २,६०० अंक गमावले आहेत. यामुळे ६ सत्रांत गुंतवणूकदारांना सुमारे २० लाख कोटींचा फटका बसला आहे.

आजच्या सत्रात मेटल, रियल्टी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. बीएसई मिडकॅप निर्देशांक १ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरला. पॉवर वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल चिन्हात बंद झाले.

संबंधित बातम्या

सेन्सेक्स आज ६३, ७७४ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६३,११४ पर्यंत खाली घसरला. सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर टॉप लूजर ठरला. हा शेअर ४ टक्क्यांनी घसरून १,५०६ रुपयांवर आला. बजाज फायनान्स ३.५२ टक्के, एशियन पेंट्स ३.१८ टक्के, बजाज फायनान्स ३ टक्के, नेस्ले इंडिया २.९७ टक्के, टायटन २.६५ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील २.५५ टक्के, टेक महिंद्रा २.३६ टक्के, एचडीएफसी बँक २.२६ टक्के, टेक महिंद्रा २.१३ टक्के, कोटक बँक १.८३ टक्के, टाटा मोटर्स १.८७ टक्के, एलटी १.८२ टक्के, एसबीआय १.५७ टक्के, टीसीएस १.५३ टक्के, मारुती १.४७ टक्के आणि रिलायन्स १.४३ टक्क्यांनी घसरला. केवळ ॲक्सिस बँकेच्या शेअरने हिरव्या चिन्हात व्यवहार केला.

झोमॅटोला फटका

फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे (Shares of Zomato ) चे शेअर्स आज बीएसई (BSE) वर सुमारे ६ टक्क्यांनी घसरून १०१ रुपयांवर आला. त्यानंतर तो १०३ रुपयांवर स्थिरावला. दरम्यान, सोनाटा सॉफ्टवेअरचे शेअर्स आज सुमारे ४ टक्क्यांनी वाढले. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात १० टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर सोनाटा सॉफ्टवेअरचे शेअर्स वाढले आहेत.

घसरणीला ‘हे’ घटक कारणीभूत

परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात झालेली विक्री, अमेरिकेचे वाढते रोखे उत्पन्न आणि मध्य पूर्वेत इस्रायल-हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध हे घटक बाजारातील घसरणीला कारणीभूत ठरले आहेत. जागतिक स्तरावरील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

परदेशी गुंतवणूकदार

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी ४,२३७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) ३,५६९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

कच्च्या तेलाचे दर

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझावरील जमिनीवर आक्रमण करण्याची तयारी करत असल्याचे सांगितल्यानंतर कच्च्या तेलाचे दर बुधवारी प्रति बॅरल ९० डॉलरच्या वर गेले. कच्च्या तेलाचे वाढते दर भारतासारख्या आयातदार देशांसाठी खर्चिक ठरणार आहे.

जागतिक बाजारातील स्थिती

कमाईबाबत निराशाजनक कामगिरीनंतर अल्फाबेटचे शेअर्स घसरले. तसेच यूएस ट्रेझरीचे उत्पन्न वाढले आहे. यामुळे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीची पुन्हा चिंता ‍‍‍व्यक्त केली जात आहे. परिणामी बुधवारी अमेरिकेतील बाजारात घसरण झाली होती. अमेरिकेतील बाजाराचा मागोवा घेत आशियाई बाजारातील निर्देशांक आज कोसळले. चीनचा ब्लू-चिप निर्देशांक ०.५१ टक्क्यांनी घसरला. तर जपानचा निक्केई निर्देशांक २.१४ टक्क्यांनी खाली आला. निक्केईची ऑक्टोबरनंतरची ही सर्वात कमकुवत स्थिती आहे.

हे ही वाचा :

Back to top button