Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींकडून श्रमदान | पुढारी

Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींकडून श्रमदान

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  महात्मा गांधींच्या 154 व्या जयंतीपूर्वीच देशभरात स्वच्छता सेवा अभियानांतर्गत श्रमदान करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अभियानात सहभाग घेतला. कुस्तीपटू अंकित बय्यनपुरिया पंतप्रधानांसह सहभागी झाला होता.

स्वच्छ आणि निरोगी भारताचा संदेश पंतप्रधानांनी दिला. सप्टेंबरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून स्वच्छतेसाठी श्रमदानाचे आवाहनही केले होते. पंतप्रधानांनी त्यासाठी, ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ अशी घोषणाही दिली होती. रविवारच्या मोहिमेसाठी देशभरातील 6.4 लाख ठिकाणांची निवड करण्यात आली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी विविध राज्यांत सफाई अभियानात सहभाग नोंदवून स्वच्छतेचा संदेश दिला. गृहमंत्री शहा यांनी अहमदाबादमध्ये श्रमदान केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही सहभागी झाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजस्थानमधील कोटा शहरात स्वच्छता केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीतापूरमध्ये मोहिमेत भाग घेतला. पाटण्यात रविशंकर प्रसाद यांनी हाती झाडू घेऊन रस्ते सफाई केली.

मोदी-अंकित चर्चा…

मोदी : आरोग्यासाठी, फिटनेससाठी तुम्ही इतकी मेहनत करता. स्वच्छतेबाबत काय?
अंकित : वातावरण स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे. हे ठिक असेल तर आम्हीही ठिक राहू.
मोदी : व्यायामाला किती वेळ देता?
अंकित : रोज 4-5 तास. तुम्हीही व्यायाम करता ना?
मोदी : हो, पण जास्त नाही. जितका हवा तितकाच. जेवणाची वेळ पाळतो. झोपण्यासाठी मात्र वेळ मिळत नाही.
अंकित : देश शांततेत झोपावा म्हणून तुम्हाला जागावे लागते.

Back to top button