पृथ्वीचे इलेक्ट्रॉन तयार करताहेत चंद्रावर पाणी | पुढारी

पृथ्वीचे इलेक्ट्रॉन तयार करताहेत चंद्रावर पाणी

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : पृथ्वीवरील मॅग्नेटोटेलमधील उच्च ऊर्जाभूत इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करत आहेत, असा निष्कर्ष चांद्रयान-1 च्या डेटाचे अध्ययन करणार्‍या अमेरिकेतील हवाई विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी काढला आहे.

हे इलेक्ट्रॉन पृथ्वीच्या मॅग्नेटोस्फियरमधील प्लाझ्मा शीटमध्ये असून ते अनेक प्रक्रियांना कारणीभूत ठरतात. चंद्राचे हवामानही या इलेक्ट्रॉन्समुळे बदलते, असे मनेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमीफ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. चांद्रयान-1 मोहिमेचे प्रक्षेपण 2008 मध्ये झाले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे या मोहिमेनंतरच समोर आले होते. चंद्रावर बर्फ असल्याचा दावा मोहिमेतून करण्यात आला होता. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात सूर्यप्रकाश पोहोचत नसल्यामुळे, तेथील तापमान -200 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे व तेथे बर्फाच्या रूपात पाण्याचे अस्तित्व आहे, असे तेव्हा समोर आले होते.

असे तयार होते चंद्रावर पाणी

चंद्र पृथ्वीच्या मॅग्नेटोटेलमधून (सौरवारा अजिबात पोहोचत नाही, असा पृथ्वीचा एक भाग) जातो तेव्हा चंद्राच्या हवामानात काय बदल होतात, त्याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला.
जेव्हा चंद्र मॅग्नेटोटेलच्या आत असतो तेव्हा सौर वारा पृष्ठभागावर पोहोचत नाही, अशा स्थितीत पाणी तयार होते.

काय आहे पृथ्वीचे मॅग्नेटोस्फियर, मॅग्नोटोटेल?

पृथ्वीच्या प्लाझ्मा शीट मॅग्नेटोस्फियरमधील ऊर्जाभूत कणांचे हे क्षेत्र पृथ्वीभोवतीच्या अंतराळाचा एक भाग आहे. पृथ्वीच्या गुरुत्व शक्तीने तो नियंत्रित होतो.

मॅग्नेटोस्फियरच पृथ्वीला अंतराळ हवामान व सूर्याच्या रेडिएशनपासून वाचवते. सौर वारे या मग्नेटोस्फियरला आत ढकलत असतात. त्यामुळे त्याला नवा आकार येतो. रात्री एक शेपटासारखा वा धूमकेतूसारखा आकार मॅग्नेटोस्फियरला येतो.

पृथ्वीच्या या मग्नेटोटेल क्षेत्रातील ऑक्सिजनमुळे चंद्राच्या ध्रुवीय क्षेत्रात लोह गंजत आहे. पृथ्वीच्या मॅग्नेटोटेल क्षेत्रातून चंद्राच्या जाण्याने त्याच्या हवामानात बदल होतात.

Back to top button